भाजप व खडसेंमध्ये ‘डील’!
By Admin | Updated: June 5, 2016 00:03 IST2016-06-04T23:56:28+5:302016-06-05T00:03:26+5:30
शिर्डी : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे, ही भाजपा आणि खडसे यांच्यामध्ये झालेली ‘डील’असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.

भाजप व खडसेंमध्ये ‘डील’!
शिर्डी : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे, ही भाजपा आणि खडसे यांच्यामध्ये झालेली ‘डील’असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. खडसेंचा राजीनामा म्हणजे राज्यातील लोकभावनेचा विजय असल्याचे त्यांनी शिर्डीत बोलताना सांगितले.
भाजप आणि खडसे यांच्यात झालेल्या डीलनुसार, खडसेंनी पक्ष फोडू नये, तूर्त राजीनामा देऊन पक्षाची अब्रू वाचवावी. त्याच्या मोबदल्यात वर्ष संपण्यापूर्वीच खडसेंना सर्व आरोपातून क्लीन चीट देऊन पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाणार आहे, असा आरोप विखे यांनी केला़
कारवाईमुळे पक्षात फूट पडण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळेच खडसेंचा राजीनामा घेण्यापूर्वी भाजपने विधान परिषद निवडणुकीत उतरविलेले दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेतले़ खडसेंची भीती नसती तर कदाचित भाजपने ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नसती, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने फक्त आरोप केले; पुरावे दिले नाहीत, या खडसेंच्या विधानाचा त्यांनी समाचार घेताना खडसेंना नेमके काय अपेक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला़ दाऊदशी संभाषण झाले की नाही? याचा पुरावा दाऊदकडून आणायला आमच्याकडे दाऊदचा नंबर नाही. खडसेंकडे नंबर आहे. त्यांनी दाऊदला फोन करून त्यांचे बोलणे झाले नाही, ते जाहीर करायला सांगावे. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात उद्योग मंत्र्यांनी जमीन एमआयडीसीची असल्याचे सांगितले.
अंबरनाथ येथील जमिनीची किंमत ५ कोटी असताना त्यासाठी ३० कोटींची लाच कशी मागितली जाऊ शकते? असा खडसेंचा दावा असताना महसूल विभागाचीच कागदपत्रे सादर करून या जमिनीची किंमत २२६ कोटी रूपये असल्याचे दाखवतायेत. खडसेंना उद्योगमंत्री व महसूलच्या कागदपत्रांवर विश्वास नसेल तर मग कशावर आहे? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान विखे यांनी दिले़
भाजपच्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पक्ष खडसेंच्या पाठिशी असल्याचे सांगितले. पण काल-परवापर्यंत खडसेंच्या बाजूने टीव्ही चॅनल्सवर बाजू मांडायला पक्षाचे प्रवक्ते तयार नव्हते. परंतु आता डील झाल्यानंतर मात्र भाजप अचानक खडसेंसोबत उभी झाली आहे.
विरोधी पक्षनेते असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सभागृहात रणकंदन माजवणारे खडसे हे त्यांच्यावर वेळ येताच पळ काढत आहेत. आपण केलेल्या कृत्याला कधी ना कधी सामोरे जावे लागते, असा चिमटा विखे यांनी काढला़ केवळ खडसेंचा राजीनामा नको तर अन्य भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली़
मी कधी ठोस पुराव्यांशिवाय बोलत नाही. त्यासाठी मी सध्या अशा पुराव्यांच्या शोधात आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात भक्कम पुरावे मिळाल्यास आंदोलन करावेच लागेल. खडसे यांच्यावर कारवाई हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर बोलणे उचित नाही. पण ज्या ज्या वेळी समाज, राज्य, देशाचं जनहित असेल तर अशावेळी कठोर कारवाई करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार चालविणारे लोक निष्कलंक असले पाहिजेत. सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन आणि त्याग असला पाहिजे. असे लोक सरकारमध्ये असतील तरच या राज्याला व देशाला उज्ज्वल भवितव्य मिळू शकेल. सरकारमधील लोकच जनतेला जबाबदार आहेत. ते काय करतात, कसे वागतात, हे समाज पाहत असतो. संध्याकाळी टेबलावर बाटली अन् ग्लास असेल तर असे लोक समाजाला काय भविष्य देणार? समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या लोकांचे हे केवळ कर्तव्यच नाही, तर जबाबदारीही आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे.
-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक