मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे डांबरीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 12:28 IST2017-11-23T12:24:07+5:302017-11-23T12:28:11+5:30
गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे डांबरीकरण रखडले
अहमदनगर : गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना. तीन दिवसांत डांबरीकरणास सुरूवात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दरेवाडी-उक्कडगाव-मांडवा या रस्त्याचे काम रखडले होते. चालू आर्थिक वर्षात या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे. एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत. खडीकरणाचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण झाले. पुढे पावसाचे दिवस सुरू झाल्याने डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाचे चार महिने उलटून गेले आहेत. पाऊस थांबून महिना झाला, तरी डांबरीकरणाचे काम करण्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार डोळेझाक करीत आहेत.
कधी नव्हे तो गेल्या बारा वर्षांतून एकदा या रस्त्याला मुहूर्त लागला. खडीकरणानंतर डांबरीकरणही पूर्ण होऊन या रस्त्याचा एकादाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा होती. परंतु डांबरीकरण रखडल्याने या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येत्या तीन दिवसांत डांबरीकरणाचे काम झाले नाही, तर जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नारायणडोहो, उक्कडगाव, तसेच मांडवे येथील नागरिकांनी दिला आहे.
अधिका-यांचे आश्वासन हवेत
या रस्याचे डांबरीकरण आॅक्टोबरअखेर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. परंतु महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याने त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. गुरूवारी पुन्हा कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.