कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:50+5:302021-06-02T04:16:50+5:30
श्रीरामपूर : कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अंध व्यक्तींसमोर अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. रेल्वेगाड्यांमध्ये कटलरीचा व्यवसाय करणारे अंध ...

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार
श्रीरामपूर : कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अंध व्यक्तींसमोर अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. रेल्वेगाड्यांमध्ये कटलरीचा व्यवसाय करणारे अंध व्यक्ती रोजगाराअभावी संकटात सापडले आहेत. संपूर्ण कुटुंबावरच उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग संघटना अंध व्यक्तींना आधार देण्याचे काम करतात. उत्तर नगर जिल्ह्यात लक्ष्मण खडके यांच्या नेतृत्वाखाली अशी संघटना कार्यरत आहेत. शंभर ते दीडशे अंध व्यक्ती या संघटनेच्या संपर्कात आहेत. सध्या कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार दाटून आला आहे.
बहुतांशी अंध व्यक्ती हे कटलरीचा व्यवसाय करतात. यामध्ये मोबाईल कव्हर, चार्जर, बॅटरी या वस्तूंचीही ते विक्री करतात. हा व्यवसाय प्रामुख्याने रेल्वेगाड्यांमध्ये केला जातो. मात्र, यात अनेकांकडे अशा विक्री व्यवसायाचा कोणताही अधिकृत परवाना नसतो. केवळ रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या सकारात्मक व मानवी दृष्टिकोनावर अंध व्यक्तीला रेल्वेत प्रवास करून व्यवसायाची परवानगी मिळते. त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. याबरोबरच काही अंध व्यक्तींनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेत पिठाची गिरणी, कुक्कुटपालन असे काही व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे हे व्यवसायही संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता करायचे तरी काय? असा पेच उभा राहिला आहे.
------
परिस्थिती गंभीर, मात्र मार्ग निघेल
कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच समाज आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. मात्र, त्यातही अंधांसमोरचे संकट अधिक गहिरे आहे. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मोठा झगडा करावा लागतो. मात्र, परिस्थितीला धरून बसलो तर काहीही होणार नाही. सकारात्मक भूमिकेतूनच मार्ग दिसतील, अशी भावना अंध व्यक्तींने बोलून दाखविली.
------
मी रेल्वेगाडीमध्ये कटलरीचा व्यवसाय करीत होतो. मात्र, त्यानंतर आत्मनिर्भर योजनेतून दहा हजार रुपयांची मदत घेत पिठाची गिरणी सुरू केली. त्यातून पत्नी व दोन मुलांचे कुटुंब चालवितो. मात्र, लॉकडाऊनमुळे हा व्यवसायही अडचणीत सापडला आहे. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत.
गोरख काटे,
वाकडी, ता. राहता.
-----
मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र. बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावल्या. आता पुन्हा याच व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. जगण्याची लढाई सुरू आहे.
सचिन अरविंद पोटे,
राहाता.
-----
राहता व श्रीरामपूर तालुक्यांतील दहा ते बारा अंध व्यक्तींनी स्वतःचा स्वरगंध नावाचा ऑर्केस्ट्रा सुरू केला आहे. अंध विद्यालयांमध्ये हे शिक्षण घेत असताना त्यांना संगीत विषयाचे धडे मिळाले होते. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती केली. विवाह समारंभ, वाढदिवस व धार्मिक कार्यक्रमांमध्ये ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून या अंध व्यक्ती मनोरंजन करतात. त्यासाठी राज्यभर दौरे करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा व्यवसाय बंद आहे.
----
लसीकरणाला अडचणी
उत्तर नगर जिल्ह्यातील अंध व्यक्तीला झालेल्या कोरोना संसर्गाची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, लसीकरणासाठी नाव नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती गोरख काटे यांनी दिली.