मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:30 IST2019-06-04T18:30:21+5:302019-06-04T18:30:28+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणात सर्रास भल्या पहाटे जिलेटीनचा स्फोटव्दारे मासेमारी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे़

मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणात सर्रास भल्या पहाटे जिलेटीनचा स्फोटव्दारे मासेमारी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे़ स्फोटामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे़
जिलेटिन स्फोट करून मासेमारी करणे हे बेकायदेशीर असतांना पाटबंधारे खाते मात्र अनभिज्ञ आहे़ एकीकडे पाण्याची पातळी खाली जात असतांना दुसरीकडे जिलेटीनचा वापर करून केल्या जाणा-या मासेमारीबाबत पर्यावरण पे्रमींनी चिंता व्यक्त केली आहे़ मासेमारी विभागानेही गंभीर प्रकरणाक डे दुर्लक्ष केले आहे़ मुळा धरणात विषारी भात टाकून मासेमारी केली जात असतांना लोकमतमध्ये लेखमाला प्रसिध्द करून भांडाफोड करण्यात आला होता़ मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर विषारी मासेमारी बंद पडली होती़ आता मासेमारी करणा-यांनी जाळयाचा वापर करण्याऐवजी थेट पहाटे जिलेटीनचा स्फोट करून मुळा धरणाचा परिसर दणाणून सोडला आहे़
मुळा धरणात जिलेटीनव्दारे मासेमारी करणे हे बेकायदेशीर आहे़ पाटबंधारे खात्याला स्फोटाची कल्पना असतांनाही बघ्याची भुमिका घेतली जात आहे़ पाटबंधारे खात्याकडे संरक्षणासाठी कर्मचारी नाहीत़ यासंधीचा फायदा घेत मासेमारी करणारे जाळे टाकून मासेमारी करण्याऐवजी थेट जिलेटीनचा स्फोट घडवून आणतात़ त्यामुळे एकाच वेळी मोठया प्रमाणावर मासे उपलब्ध होतात़ संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे़
पाटबंधारे खात्याचा संबंध पाण्याशी आहे़ पाण्याचे नमुने दरमहा तपासले जात आहेत़ मच्छमारी विभागाने टेंडर काढून त्याचा ठेका दिलेला आहे़ जिलेटीनचा स्फोट होत असल्यास त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदार ठेकेदाराची आहे़ -अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण अभियंता