बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल

By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T23:02:40+5:302014-08-24T23:08:45+5:30

अहमदनगर: यंदाच्या बैल पोळा सणावरही दुष्काळाची छाया आहे़ पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके गेली आहेत़ त्याचा थेट परिणाम बैल पोळ्यावरही झाला

Dangerous swings on bulls | बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल

बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल

अहमदनगर: यंदाच्या बैल पोळा सणावरही दुष्काळाची छाया आहे़ पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके गेली आहेत़ त्याचा थेट परिणाम बैल पोळ्यावरही झाला असून, साहित्य खरेदीत कमालीचा निरुत्साह असल्याचे दिसून आले़ बैलांची घटती संख्या आणि दुष्काळाचे सावट, यामुळे साहित्याला उठाव नसल्याचे रविवारी गंजबाजारातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले़
बैल पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ पोळा आला की सर्वांनाच उत्सुकता असते, ती बैल पूजनाची़ बैलांसाठी करण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीचे काम महिनाभरपासून सुरू असते़ बैलासाठी शिंदोरी, गोंडे, कसारा, काळे गंडे, घोगरमाळ, पैजनी कासारा, यासारखे साहित्य मोठ्या प्रमणात खरेदी केले जाते़ बळीराजा सवडीनुसार आपल्या आवडत्या बैलांसाठी काहीना काही खरेदी करतो़ पाऊस वेळेवर पडल्यास शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते़ परंतु यंदा वरुणराजाने पाठ फिरविली़ पाऊस वेळेवर झाला नाही़ पावसाने ओढ दिल्याने घरात नवीन पिके आली नाहीत़ खरिपाची पिके न आल्याने बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ सणावारांत होणारी खरेदीही मंदावली आहे़अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले खरे, पण उशिराने झाले आहे़ बैल पोळा सणासाठी होणाऱ्या खरेदीत त्यामुळे कमालीची घट झाली असून, साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ शेतकऱ्यांत साहित्य खरेदीसाठी उत्साह नसल्याचे जाणवले़ सकाळी शेतकऱ्यांनी गजबजलेल्या गंजबाजारात दुपारनंतर शुकशुकाट झाला़ शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने बाजारात निरुत्साही वातावरण असल्याचे चित्र होते़
बैल पोळा सणाच्या साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे़ लोकरीच्या ८० रुपयात मिळणाऱ्या शिंगदोरीची किंमत ११० रुपये झाली आहे़ सुताचा ८० रुपयांना मिळणारा कासरा १२० रुपयांना झाला असून, इतर साहित्याचेही दर वाढले आहेत़ त्यामुळे साहित्याचे दर सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत़ दरवाढ झाल्याने शेतकरी किंमत विचारून निघून जात होते़ ग्राहकांची संख्या एकदम घटल्यामुळे व्यापारी फारशी घासाघीस न करता साहित्याची विक्री करत होते़ परंतु शेतकऱ्यांना साहित्य खरेदीत फारसा रस नव्हता़
यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे़ पूर्वी ज्या गावात ५०- ६० जोड्या असायच्या त्या गावात सध्या पाच ते सहा जोड्या पाहायला मिळत आहे़ त्यात दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे़ त्यामुळे शेतकरी सातत्याने दुष्काळाच्या छायेत असून, इच्छा असून त्यांना बैल ठेवता येत नाहीत़ त्यामुळे पोळ्याच्या साहित्याला उठाव नाही़
- रामदास पटवेकर, व्यापारी
पाऊस वेळेवर झाला नाही़ पाऊस नाही तर पिकही नाही़ आता कुठे पाऊस सुरू झाला आहे़त्याला फारसा जोर नाही़ पाऊस नसल्याने खरिपाचे पीक आले नाहीत़ पीक न आल्याने पैसे येणार कुठून पोळा तसा महत्वाचा सण़ पण पीक न आल्याने कसा-बसा सण साजरा करायचा़ मुक्या बैलांना तसे ठेवता येत नाही़ म्हणून ही खरेदी करावी लागत असून, परंपरेनुसार जे आपण खरेदी करतो़ तेच साहित्य घेऊन सण साजरा करायचा विचार आहे़
- बबन बोरुडे, शेतकरी सारोळा बध्दी

Web Title: Dangerous swings on bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.