कासलीत ऊस पिकाला विद्युत तारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:38+5:302021-09-21T04:22:38+5:30
कोपरगाव : शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकातून महावितरण कंपनीच्या विद्युत तारा गेल्या आहेत. या तारांच्या घर्षणातून आग लागून ऊस ...

कासलीत ऊस पिकाला विद्युत तारांचा धोका
कोपरगाव : शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकातून महावितरण कंपनीच्या विद्युत तारा गेल्या आहेत. या तारांच्या घर्षणातून आग लागून ऊस पेट घेऊन मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या तारा स्थलांतरित कराव्यात, या मागणीचे निवेदन कासली येथील शेतकरी वसंत त्रंबक भगुरे यांनी कोपरगाव महावितरण कार्यालयास सोमवारी (दि. २०) दिले आहे.
भगुरे यांच्या गट नंबर १७९/१ मधील शेतातून दहेगाव उपकेंद्राची वीज वाहिनी गेलेली आहे. सद्यस्थितीत या विद्युत वाहिनी उसाच्या शेतात लोंबकळत असल्याने उसाला धोका निर्माण झाला आहे. या विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग लागून दीड एकरात उभा असलेला ऊस पेट घेऊ शकतो. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भगुरे यांनी दोन महिन्यांपूर्वी वीज वितरण कार्यालयाला पत्र देऊन सदर वाहिन्या व्यवस्थित कराव्या अथवा स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी केली होती. परंतु, यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यासाठी भगुरे यांनी सोमवारी तहसील कार्यलय, वीज वितरण कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे. वारंवार निवेदने देऊन ही विद्युत वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मोठी दुर्घटना झाल्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार का, असा सवाल शेतकरी भगुरे यांनी उपस्थित केला आहे.
.......