भाजपसह विरोधी नगरसेविकांची दांडी

By Admin | Updated: July 11, 2016 23:49 IST2016-07-11T23:39:37+5:302016-07-11T23:49:26+5:30

अहमदनगर : महापौर सुरेखा कदम यांनी बोलविलेल्या बैठकीला भाजपसह विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी दांडी मारली.

Dandi with anti-BJP corporators along with BJP | भाजपसह विरोधी नगरसेविकांची दांडी

भाजपसह विरोधी नगरसेविकांची दांडी

अहमदनगर : महिला नगरसेविकांच्या प्रभागातील अडचणी जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी बोलविलेल्या बैठकीला भाजपसह विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी दांडी मारली. ३५ पैकी फक्त ९ नगरसेविका (महापौरांसह) हजर होत्या. दैनंदिन साफसफाई, पुरेसे पाणी आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची माफक अपेक्षा महिला नगरसेविकांनी व्यक्त केली.
महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला नगरसेविकांची बैठक आयोजित करण्याची घोषणा केली होती. महिला नगरसेविकांच्या प्रभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर विशेष लक्ष देवून उपाययोजना आखणे असा बैठकीचा उद्देश होता. त्यादृष्टीने कदम यांनी सोमवारी (दि.११) सायंकाळी पाच वाजता ही बैठक बोलविली होती. महापौर कार्यालयातून सर्वच नगरसेविकांना निरोप देण्यात आले. मात्र, या बैठकीसाठी केवळ आठच नगरसेविका उपस्थित होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या शारदा ढवण, छाया तिवारी, दिपाली बारस्कर, प्रतिभा भांगरे, सुनीता फुलसौंदर, राष्ट्रवादीच्या सभापती नसीम शेख, अपक्ष नगरसेविका सारिका भुतकर, उषा ठाणगे यांचा समावेश होता. शिवसेनेच्याच उर्वरित नगरसेविका यांनी कौटुंबिक कारणामुळे येणार नसल्याचे कळविले होते.
भाजपच्या एकही महिला नगरसेविका बैठकीला नव्हत्या. विरोधी पक्षाच्याही नगरसेविकांना निरोप दिले होते, मात्र त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dandi with anti-BJP corporators along with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.