कुकडीच्या आवर्तनाऐवजी भरणार पुणे जिल्ह्यातील बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:45+5:302021-04-04T04:21:45+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून फेब्रुवारी महिन्यात एक आवर्तन सोडण्यात आले. दुसरे आवर्तन सोडण्यासाठी डिंबे धरणातून येडगाव धरणात ...

कुकडीच्या आवर्तनाऐवजी भरणार पुणे जिल्ह्यातील बंधारे
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून फेब्रुवारी महिन्यात एक आवर्तन सोडण्यात आले. दुसरे आवर्तन सोडण्यासाठी डिंबे धरणातून येडगाव धरणात पाणी सुरू ठेवण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील बंधारे भरण्यासाठी डिंभेतून घोड नदीत पाणी सोडण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नगर, सोलापूर जिल्ह्याला दुसरे आवर्तन मिळणे कठीण जाणार आहे.
१ एप्रिल रोजी येडगाव धरणात ६५७ एमसीएफटी, माणिकडोह धरणात ९५३ एमसीएफटी, वडज ६४० एमसीएफटी, डिंभे ६ हजार ५४२ एमसीएफटी, कुकडीच्या धरणात ९ हजार १३८ एमसीएफटी (३१ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी यावेळी ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १४ टक्के पाणीसाठा कमी आहे. घोडमध्ये २ हजार ३४१ एमसीएफटी (५२ टक्के), विसापूरमध्ये ३८७ एमसीएफटी (४३ टक्के), तर सीनामध्ये १ हजार ३७१ एमसीएफटी (७१ टक्के) इतका पाणीसाठा आहे.
कुकडीचे पहिले आवर्तन १३ मार्च रोजी बंद झाले. डिंभे धरणातील उपलब्ध पाणीसाठा व येडगाव धरणाची परिस्थिती विचारात घेता डिंभेतून १३ मार्चपासून येडगावमध्ये पाणी सोडणे आवश्यक होते. १३ एप्रिलअखेर येडगावमध्ये १ टीएमसी पाणी आले असते. हे पाणी कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले असते. मात्र, याकडे कोणीच लक्ष दिले नाही. आता बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था झाली आहे.
९ एप्रिल रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाईल आणि धरणात पुरेसा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्याने शेतीसाठी आवर्तन सोडता येणार नाही, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल घेऊन तयारी करावी व २५ मे नंतर पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. कुकडीचे दुसरे आवर्तन एप्रिलमध्ये सोडण्यासाठी डिंभेचे पाणी येडगाव धरणात सुरू का ठेवले नाही याबाबत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची गरज आहे.
---
पिंपळगाव जोगेचे पाणी ठरणार कळीचा मुद्दा..
यावर्षी पिंपळगाव जोगे धरण १ हजार ८८७ एमसीएफटी (४८ टक्के) भरले. पिंपळगाव जोगेच्या डेड स्टाॅकमधून येडगाव धरणात पाणी सोडता येते. मात्र, याला स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी विरोध करतील. आता पिंपळगाव जोगेच्या पाण्याशिवाय कुकडीचे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्य नाही. त्यामुळे पिंपळगाव जोगेतील पाणी कळीचा मुद्दा ठरणार आहे.