तालुक्याच्या कारभाऱ्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:18+5:302021-01-08T05:09:18+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला ...

तालुक्याच्या कारभाऱ्यांची दमछाक
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत लक्ष घालण्याची गळ कार्यकर्ते तालुक्याच्या कारभाऱ्यांना घालत आहेत. त्यामुळे आता कुठे कुठे घालू लक्ष, असे म्हणण्याची वेळ तालुक्याच्या कारभाऱ्यांवर ओढवली आहे.
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत निवडणुका झाल्या नाही. कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. प्रचाराचा शुभारंभ नेत्यांच्याच हस्ते करायचा, असा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका होत असल्याने नेत्यांना ते शक्य नाही. विधानसभेसह इतर निवडणुकांत गावोगावचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा संभाळतात. गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असते. गावातील मंडळे तयार करताना तालुक्यातील कारभाऱ्यांना लक्ष घालावे लागते. कार्यकर्तेही नेत्यांना विचारून पुढचा निर्णय घेतात. काही ठिकाणी तर दोन्ही मंडळे एकाच नेत्यांची आहेत. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला; पण यश आले नाही. त्यामुळे दोन्ही मंडळांच्या प्रचाराला कसे जायचे, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. दोन्ही मंडळं आपलीच, असे काही नेते सांगत असून, काहींनी गावातल्या राजकारणात मला ओढू नका, तुमचे तुम्हीच ठरवा काय ते, असे तालुक्याचे कारभारी स्पष्टपणे सांगत आहेत; पण अशी स्पष्ट भूमिका घेणारे फारच कमी आहेत. त्यात राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे नेत्यांना, इतर मित्रपक्षांच्या मंडळांना दुखावता येत नाही. त्यामुळे त्यांचीही अडचणच झाली असून, आता तर जिल्हा बँकेची मतदारयादीही जाहीर झाली आहे. बँकेची निवडणूक कोणत्याहीक्षणी जाहीर होऊ शकते. तालुक्यातील नेत्यांना या निवडणुकीचीही तयारी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने रणनिती आखली जात असून, सर्वच आघाड्यांवर नेत्यांना काम करावे लागत आहे.
....
नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जात आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील नेतेही हजेरी लावत असून, उमेदवारांना पाठबळ देत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका आल्याने त्यांना सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नेत्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.