शेवगाव : अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावातील कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पुराचा सर्वाधिक फटका नंदिनी व नानी नदी काठच्या गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नेमण्यात आलेल्या २६ पथकांकडून प्रत्यक्ष पंचनाम्याचे काम पूर्ण झाले. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे दहा गावातील २ हजार ७०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे ३ हजार ७०९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला आहे, असे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.
वरील गावांचा पंचनामा पूर्ण होत असतानाच पुन्हा मुसळधार पावसाने कांबी व बोधेगाव परिसरातील गावांना झोडपले. कांबी गावात नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने तेथील शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पथकांना देण्यात आले आहेत.
सोमवारी (दि. ३०) रात्री झालेली अतिवृष्टी व त्यात आलेल्या पुरामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावातील लागवडीखालील कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शेवगाव शहरातील दोन वस्त्यांमधील पंचनामे अद्याप सुरू असून, तालुक्यात अन्यत्र कुठे नुकसान झाले आहे का? याची माहिती संकलित केली जाणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील दहा गावातील १११ घरांची पडझड झाली. घरात पाणी शिरल्याने ९११ विविध वस्तूंचे नुकसान झाले. १६८ जनावरे मृत झाली असून, १ हजार ९८२ जनावरे वाहून गेल्याचे पथकाने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा, खरडगाव, वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, भगूर, वडुले बुद्रुक, जोहारापूर, शेवगाव शहरातील लांडेवस्तीला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
----
एकाच वस्तीवरील ७९४ जनावरे गेली वाहून
पुरामुळे सर्वाधिक खरडगाव येथील ७३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. लांडे वस्तीवरील सर्वाधिक ७९४ जनावरे वाहून गेली असून, सर्वाधिक आखेगाव तितर्फा येथील ६३ जनावरे मृत झाली आहेत. वरूर बुद्रुक गावातील घरामध्ये पाणी शिरल्याने सर्वाधिक ३६५ वस्तूंचे नुकसान झाले असून, सर्वात जास्त भगूर येथील ७३ घरांची पडझड झालेली आहे. पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येऊन त्यानंतर नुकसान भरपाई मिळणार आहे.
-----
बंधाऱ्यांचे साडेचौदा लाखांचे नुकसान
जिल्हा परिषदअंतर्गत लघु पाटबंधारे विभागाने चापडगाव, मंगरूळ, लखमापुरी येथील पाझर तलाव, वरूर येथील दोन, आखेगाव येथील चार, तर भगूर, खरडगाव येथील प्रत्येकी एक अशा साठवण बंधाऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यामध्ये साडेचौदा लाखांचे नुकसान झाले आहे.
----
रस्त्यांचे साडेसात कोटींचे नुकसान...
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, योजना बाह्य रस्त्याचा नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला. तालुक्यातील विविध २९ रस्त्यांच्या पृष्ठभागाचे नुकसान व साईडपट्ट्या वाहून गेल्याने दुरुस्तीसाठी अंदाजित ७ कोटी ५ लाखांच्या खर्चाचा अहवाल सादर केला आहे.
----
०६ शेवगाव रस्ता
अतिवृष्टीने शेवगाव तालुक्यातील रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे.