दहिगावने सेवा संस्था उभारणार व्यापारी संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:21+5:302021-08-22T04:25:21+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ...

दहिगावने सेवा संस्था उभारणार व्यापारी संकुल
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी सभेत सहभाग घेत अनेक ठराव मंजूर केले. संस्थेच्या स्वमालकीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. यात एकूण ४२ गाळ्यांचे बांधकाम करण्यात येणार असून यासाठी जिल्हा बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.
चालू वर्षी वाटप केलेल्या ९ कोटी ३९ लाख ६३ हजार ५२० रुपयांचे कर्ज शंभर टक्के वसूल झाल्याने संस्थेला भरघोस नफा मिळाला आहे. यातून संस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप करण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी स्थापन केलेल्या या मातृसंस्थेचे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले संचालक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दहिगावने वि. का. सेवा सोसायटीचा तालुक्यात अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक आहे. व्यापारी संकुलाच्या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख होते. मागील इतिवृत्ताचे वाचन संस्थेचे सचिव कृष्णकांत मगर व सामृत यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे शाखाधिकारी सूर्यकांत पाऊलबुद्धे, कर्ज व्यवस्थापक हरिचंद्र चव्हाण, संचालक जयराम नीळ, गोटीराम पवार, भाऊराव काळे, अशोक थोटे, लक्ष्मण काशीद, मेजर संतोष घुले आदींसह सभासद ऑनलाईन उपस्थित होते. उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड यांनी आभार मानले.