दाढ खुर्द ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीचे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:34+5:302021-07-05T04:14:34+5:30
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे शुक्रवारी रात्री अवैध वाळू तस्करी करणारे वाहन सरपंच सतीश जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून ...

दाढ खुर्द ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीचे वाहन पकडले
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे शुक्रवारी रात्री अवैध वाळू तस्करी करणारे वाहन सरपंच सतीश जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून तलाठी व पोलिसांच्या ताब्यात दिले असून, आश्वी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दाढ खुर्दच्या कामगार तलाठी मंगल सांगळे यांनी तक्रार दाखल केली.
शनिवारी सकाळी दाढ खुर्दचे सरपंच सतीष जोशी यांनी फोन करून ग्रामस्थांच्या मदतीने अवैध वाळू तस्करीचे वाहन पकडल्याची माहिती तलाठी सांगळे यांना दिली. त्यामुळे सांगळे घटनास्थळी गेल्या. त्या ठिकाणी सरपंच सतीश जोशी, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जमधडे, नानासाहेब वाघमारे, भागवत जोशी, राजेंद्र जमधडे, संदीप जोरी, तसेच पोलीस हवालदार रणधीर व झोडंगे उपस्थित होते. यावेळी सरपंच सतीश जोशी यांनी माहिती दिली. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील रस्त्यावरून विना नंबरची झेनाँन गाडी प्रवरा नदीकडून येताना दिसली.
त्यामुळे आम्हाला संशय आल्याने आम्ही ती गाडी थांबवून पाहणी केली असता त्या गाडीमध्ये वाळू भरलेली होती. त्यामुळे वाहनातील व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानी सौरव संजय मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) व अविनाश गणपत पवार (रा. चंद्रपूर, ता. राहाता) अशी नावे सांगितली, तर त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत असताना अंधाराचा फायदा घेऊन ते दोघे पळून गेले.
सांगळे यांनी वाळू वाहनाची पाहणी करून १ लाख ४ हजार रुपये मुद्देमालाचा पंचनामा करीत वाळूचे वाहन पोलिसाच्या मदतीने आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तात्याराव वाघमारे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.