सीटी बसला ‘डबल बेल’

By Admin | Updated: July 1, 2014 00:15 IST2014-06-30T23:26:49+5:302014-07-01T00:15:33+5:30

अहमदनगर: शहर बससेवा बंद झाल्याने नगरकरांचे हाल सुरू झाले. नगरकरांकडून बोंबाबोंब सुरू झाली. विरोधकांनीही त्याचे भांडवल करत जिल्हाधिकाऱ्यांनाच मार्ग काढण्याची गळ घातली.

CT double sitting 'double bell' | सीटी बसला ‘डबल बेल’

सीटी बसला ‘डबल बेल’

अहमदनगर: शहर बससेवा बंद झाल्याने नगरकरांचे हाल सुरू झाले. नगरकरांकडून बोंबाबोंब सुरू झाली. विरोधकांनीही त्याचे भांडवल करत जिल्हाधिकाऱ्यांनाच मार्ग काढण्याची गळ घातली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एस.टी बसचा पर्याय सुचविला. बुधवारपासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र ही सुविधा महामार्गावरच लागू असणार असून उपनगरात सेवा दिली जाणार नाही. त्यामुळे या बैठकीत सीटी बसला तशी ‘डबल बेल’ मिळाली.
तोट्याचे कारण सांगत प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेने १८ जून पासून शहर बससेवा बंद केली आहे. बससेवा बंद झाल्याने शहरवासीयांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. विरोधी सेनेने त्याविरोधात आवाज उठविला. मनपा प्रशासन दाद देईना म्हणून सेनेने जिल्हाधिकाऱ्यांनाच गळ घातली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अनिल कवडे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे नगर येथील अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांची बैठक घेतली. बैठक काही मिनिटेच चालली पण त्यातून एस.टी.चा पर्याय समोर आला.
माळीवाडा व तारकपूर आगारातून स्थानिक बसेस जातात. त्यातून नगर शहरातील नागरिकांना प्रवास करता येणे शक्य आहे. शहरातील दिल्लीगेट, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, सावेडी नाका, बोल्हेगाव, नागापूर व एमआयडीसीतील थांब्यावर ही बस थांबविण्यात यावी. नियमानुसार तिकीट द्यावे. त्यामुळे नगरकरांना शहर बससेवेसारखीच सेवा मिळेल असा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला. परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यास संमती दर्शवित लगेचच ही सेवा देण्याबाबत स्थानिक बस वाहक, चालकांना सूचना दिल्या जातील असे सांगितले. महापालिकेनेही त्याला संमती दिली. बुधवारपासून ही सेवा सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
(प्रतिनिधी)
या मार्गावर होईल सोय
माळीवाडा-एमआयडीसी-विळद
तारकपूर-नेप्ती चौक-शिवाजीनगर,कल्याण रस्ता
माळीवाडा-चांदणी चौक-स्टेट बॅँक चौक-भिंगार-आलमगीर
माळीवाडा-भूषणनगर- केडगाव-शाहूनगर
माळीवाडा-गोळीबार मैदान,सोलापूर रोड
माळीवाडा-तवलेनगर-गजराजनगर

Web Title: CT double sitting 'double bell'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.