अमरधाममध्ये नातेवाईकांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:14+5:302021-04-24T04:21:14+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे शुक्रवारी ६६ जणांचा मृत्यू झाला असून, येथील अमरधाममध्ये ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच ...

अमरधाममध्ये नातेवाईकांचा आक्रोश
अहमदनगर : कोरोनामुळे शुक्रवारी ६६ जणांचा मृत्यू झाला असून, येथील अमरधाममध्ये ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी दुपारी अमरधाम येथे भेट देऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी अंत्यविधीच्या वेळी नातेवाईकांनी अमरधाममध्ये प्रवेश करत स्वत:च अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी दुपारी अमरधाम येथे भेट देऊन माहिती घेतली. तेथील अडचणीही समजून घेतल्या. तेथील मनपाचे कर्मचारी सादिक सरदार पठाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयातून मृतदेह अमरधाम येथे आणण्यासाठी शववाहिका कमी पडतात. त्यामुळे अंत्यविधीस विलंब होतो. आणखी एक शववाहिका उपलब्ध करून दिल्यास वेळेवर अंत्यविधी करणे शक्य होईल. यासंदर्भात आमदार जगताप यांनी महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांना सूचना केल्या व आणखी एक शववाहिका तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगितले.
अमरधाम येथे दररोज ५५ ते ६० जणांवर अंत्यविधी केले जात आहेत. अंत्यविधीच्या वेळी नातेवाईक गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्युत दाहिनी कमी पडत असल्याने लाकडांवर अंत्यविधी होत आहेत. अंत्यविधीच्या वेळी नातेवाईकांनी गर्दी न करता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
....
रात्री उशिरापर्यंत अंत्यविधी
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. अशा कठीण परिस्थितीत ही कर्मचारी अंत्यविधी करण्याचे काम करत आहेत. लाकडांवर अंत्यविधी करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडते.