शेवगाव : गत तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या चिंता वाढविणारी ठरली. चालू महिन्यात कुठेतरी रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत असतानाच ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर साहित्याची दुकाने बंद असूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासताना दिसत आहेत. यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळण्याचा धोका वर्तविला जात आहे.
सद्यस्थितीत शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. कोरोना लस आली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. ज्यांनी कोरोनाचा धोका ओळखला ते नागरिक घरात राहूनच काळजी घेताना दिसून येत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सातत्याने कोरोनाशी लढा सुरू आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत कमी झालेल्या आकडेवारीमध्ये जानेवारी, फेब्रुवारीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मार्च, एप्रिल, मे महिन्यात चिंताजनक आकडेवारी वाढली होती. वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबर तालुका प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंगच्या संख्येत वाढ केली होती. दुसऱ्या लाटेत मृत्यूचा आलेखही वाढता राहिला आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. बाजारपेठेतील इतर दुकाने बंद आहेत. केवळ अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत, रस्त्यावर येऊन गर्दी करताना दिसत आहेत.
---
प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ..
रस्त्यावर दिसणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी बघून कडक निर्बंध आहेत की नाहीत, अशी शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासत रस्त्यावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग रोखणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---
०३ शेवगाव कोरोना
शेवगाव शहरातील बाजारपेठेत झालेली नागरिकांची गर्दी.
.