गर्दी आणि धक्काबुक्कीचा दिवस

By Admin | Updated: July 1, 2014 00:16 IST2014-06-30T23:32:18+5:302014-07-01T00:16:29+5:30

अहमदनगर : सोमवारी (दि़३०) पीक विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत असल्याने शेतकऱ्यांनी दिवसभर बँकांमध्ये मोठी गर्दी केली़ सात-बाराचा उतारा काढण्यासाठीही तलाठी कार्यालयातही शेतकऱ्यांची झुंबड

Crowd and shock day | गर्दी आणि धक्काबुक्कीचा दिवस

गर्दी आणि धक्काबुक्कीचा दिवस

अहमदनगर : सोमवारी (दि़३०) पीक विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत असल्याने शेतकऱ्यांनी दिवसभर बँकांमध्ये मोठी गर्दी केली़ सात-बाराचा उतारा काढण्यासाठीही तलाठी कार्यालयातही शेतकऱ्यांची झुंबड उडाली़ त्यामुळे जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये गर्दी, धक्काबुक्कीचे प्रकार घडले़ तर काही तलाठ्यांनाही शेतकऱ्यांकडून धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडले़
राशीन : पिक विमा भरण्यासाठी येथील युनियन बँकेच्या शाखेसमोर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होऊन धक्काबुक्की झाली. यामध्ये शेकडो शेतकरी किरकोळ स्वरुपात जखमी झाले.
पिक विमा भरण्याची आजची शेवटची तारीख असल्याने सकाळपासून बँकेच्या शाखेसमोर हजारो शेतकऱ्यांची गर्दी झाली. गर्दीमध्ये वृद्ध व महिला शेतकरी यांची संख्या लक्षणीय होती. बँकेच्या मुख्य कार्यालयात व बाहेरील प्रांगणात आलोट गर्दी होती. बँकेतील कमी कर्मचाऱ्यांचे प्रमाण असल्याने त्यांनाही भिड लोटत नव्हती. सायंकाळचे ५ वाजेनंतरही तेवढीच गर्दी असल्याने प्रवेशद्वाराचे शटर व खिडकीमधून अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र युनियन बँकेच्या कार्यालयासमोरील ओट्यावर शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. अपुऱ्या जागेमुळे झालेल्या गर्दीतील बरेचसे शेतकरी खाली पडून किरकोळ स्वरुपात जखमी झाले.
राशीनसह बारडगाव, भांबोरा, सिद्धटेक, चिलवडी, करपडी, खेड, आखोणी, ताजू, बेलवंडी, काळेवाडी, सोनाळवाडी, देशमुखवाडी, परिटवाडी, होलेवाडी आदी गावांमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़
पारनेर : तालुक्यात मंडलाधिकारी व गावनिहाय तलाठ्यांची नेमणूक करावी, तातडीने तहसिलदार नियुक्त करावे, खरीप पीक विमा हप्ता भरण्याच्या मुदतीत वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे व पारनेर बाजार समीतीचे सभापती काशीनाथ दाते यांनी ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी पाच वाजता निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी तालुक्यातील सहकारी बँकेच्या शाखांमध्ये पीक विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली़ तालुक्यात तलाठ्यांची संख्या कमी असल्याने एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा भार आहे़ त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देण्यात अडचणी निर्माण होत आहे़ त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचीत राहू शकतात, यासाठी तातडीने तलाठी मिळावेत अशी मागणी करीत जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, पारनेर बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते, आत्मा कृषी समितीचे तालुकाध्यक्ष शैलेंद्र औटी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष वसंत चेडे, किसन धुमाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजताच तहसिलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. पीक विम्याची मुदत वाढविण्याबाबत शैलेंद्र औटी यांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा केली़
दरम्यान विश्वनाथ कोरडे व काशीनाथ दाते यांनी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर यांच्याशी चर्चा केली़ पाटील यांनी आचारसंहीतेच्या आत तलाठी नेमण्याचे आश्वासन दिले़ प्रभारी तहसिलदार दत्तात्रय बाहुले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विठ्ठलराव शेळके, भाऊसाहेब खोडदे, जालींदर तानवडे, जालींदर शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते.
विसापूर : खरीप हंगामातील पिकांचा विमा हप्ता भरण्यासाठी विसापूर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांची सोमवारी मोठी गर्दी झाली़ शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरुन घेण्यासाठी बँकेने सायंकाळी उशीरापर्यंत बँकेचे कामकाज सुरु होते़ मात्र, तलाठी कार्यालयाकडून वेळेत सात-बारा उतारे न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना सोमवारी पीक विम्याचा हप्ता भरता आला नाही़ त्यामुळे पीक विम्याचा हप्ता भरण्याच्या मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
करंजी : खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये सोमवारी मोठी गर्दी झाली़ जून महिना कोरडाठाक गेल्याने सर्वसामान्य शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाअंतर्गत सुरू असलेल्या खरीप पीक विमा योजनेचा तरी लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी बाजरी आणि कपाशीचा पीक विमा भरण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. बाजरीसाठी हेक्टरी चारशे रुपये तर कपाशीसाठी हेक्टरी बाराशे रुपये पीक विमा आकारला जात आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिलराव कराळे, विभाग प्रमुख एकनाथ आटकर यांनी केली आहे. तलाठ्याकडून वेळेत सातबारा उतारा मिळत नाही. एकाच तलाठ्याकडे आठ ते दहा गावांचा पदभार असल्याने अनेक वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्या सात-बारा उतार मिळण्यास अडचणी येत आहे़ त्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यापाूसन वंचित राहत आहेत. (प्रतिनिधी)
तलाठ्याचा मनमानी कारभार
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील तलाठ्याची मनमानी थांबायला तयार नाही. सोमवारी पीक विमा भरण्यासाठी शेवटचा दिवस होता़ त्यामुळे शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात मोठी गर्दी केली़ मात्र, तलाठ्याकडून एका उताऱ्यासाठी ३० रुपये आकारणी केली जाऊ लागली़ शेतकऱ्यांकडून ३० रुपये आकारुनही फक्त मर्जीतील लोकांनाच उतारे देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तलाठ्या कार्यालयातून बाहेर ओढून धक्काबुक्की केली़
रविवारी (दि़२९) मर्जीतील लोकांना उतारे देत शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत ठेवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तलाठी एस. पी. अनारसे यांच्या अंगावर धावून जात जोरदार धक्काबुक्की केली. मात्र तलाठ्याने पुन्हा उताऱ्यागणिक तीस रुपये जमा करुन घेतले़ व सोमवारी उतारे देतो असे सांगितले. मात्र सोमवारी (दि़३०) दुपारी चार वाजेपर्यंत आगाऊ रक्कम दिलेल्या शेतकऱ्यांना उतारे न देता नव्याने पैसे देणाऱ्यांनाच उतार देणे सुरु होते़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तलाठ्याला कार्यालयातून ओढत बाहेर आणून पुन्हा धक्काबुक्की केली.
एका उताऱ्याला १५ रुपये असा दर असताना आगाऊ दुप्पट रक्कम घेऊनही उतारे न दिल्याने तलाठ्याला शिवीगाळ करीत जोरदार धक्काबुक्की केली. तलाठ्याच्या मनमानी विरोधात शेतकऱ्यांनी शनिवारी (दि़२८) निदर्शने केली होती़ रविवारीही धक्काबुक्की झाली होती़ मात्र, यातून तलाठ्याच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही़ सोमवारी दिवसभर तलाठ्याने एका उताऱ्यासाठी ३० रुपये प्रमाणे पैसे घेतल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा तहसीलदाराकडे लेखी तक्रार केली. तलाठ्याकडून शेतकऱ्यांना नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार केली आहे़ तलाठ्याला धक्काबुक्की सुरू असतानाही पैसे घेणे बंद होत नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ढकलत कार्यालयात आणले व उताऱ्याची मागणी केली.
(वार्ताहर)
कुळधरणच्या तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आलेल्या सर्व तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना कळविले जाईल.
-जयसिंग भैसडे,
तहसीलदार कर्जत

Web Title: Crowd and shock day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.