तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:50+5:302021-08-01T04:20:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनाच्या दोन लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोनाच्या दोन लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थितीत लहान मुलांना हवामानातील बदलामुळे तापासह सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे लहान मुलांना ताप आल्यास तोही अंगावर न काढता तात्काळ उपचार घेणून पुढील धोका टाळता येणे शक्य आहे, असे मत बालरोगतज्ज्ञांनी वर्तविले आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्धांना तर दुसऱ्या लाटेत तरुणांना जास्त बाधा झाली. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यातच पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असून यात लहान मुले जास्त प्रमाणात संक्रमित होण्याची भीती वर्तविली जात आहे. कोपरगाव तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, तसेच डेंग्यू, न्युमोनिया अशा साथीच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यावर उपचार घेण्यासाठी बहुतांश पालक हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तर काही स्थानिक पातळीवर उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी ताप आलेल्या प्रत्येक लहान मुलांची कोरोना चाचणी करावी, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.
.............
कोपरगावात आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण - १३,०८५
१५ वर्षाखालील रुग्ण - ६५४
...............
* लहान मुलांना ताप आला म्हणजे तो कोरोनाच आहे, असे नाही.
* तापाची लक्षणे असल्यास वेळ वाया न घालता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे.
* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वच प्रकारच्या तपासण्या करून घेणे.
* रक्तातील विविध, लघवीच्या तसेच कोरोना संदर्भातील तपासण्या करणे गरजेचे आहे.
............
सर्दी, खोकला, तापाची साथ..
हवामानातील बदलामुळे लहान मुलांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढू लागल्या आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकला, ताप येणे तसेच डेंग्यू, न्युमोनिया अशा साथीच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील दवाखान्यामध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी गर्दी वाढत आहे.
..........
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
कोरोनाच्या मागील दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांमुळे कोपरगावात प्रशासनाने लहान मुलांसाठी ग्रामीण रुग्णालयात १० बेड व एसएसजीएम येथील डेडिकेट कोविड हॉस्पिटलमध्ये ४० बेडची व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे हे ५० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
................
घाबरू नका, काळजी घ्या !
हवामानातील बदलामुळे गेल्या आठवड्यापासून लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या तसेच न्युमोनिया व डेंग्यूची लक्षणे असलेली मुले उपचारासाठी येत आहेत. ही लक्षणे असलेल्या मुलांना कोरोना आहेच असे म्हणता येणार नाही. मात्र, त्याचे निदान करण्यासाठी पालकांनी घाबरून न जाता आजाराच्या प्राथमिक स्तरावर तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवणे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आजाराचे निदान होऊन उपचार करणे सोपे होते. त्यातून पुढील होणारा धोका टाळता येऊ शकतो.
- डॉ. ए. एस. आदिक, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, कोपरगाव
...........
डमी - ९९१ चा विषय