‘पारनेर’ विक्रीचे संकट तूर्त टळले
By Admin | Updated: June 12, 2014 00:10 IST2014-06-11T23:46:48+5:302014-06-12T00:10:40+5:30
पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर विक्रीचा राज्य बँकेचा डाव फसला.
‘पारनेर’ विक्रीचे संकट तूर्त टळले
पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर विक्रीचा राज्य बँकेचा डाव फसला.दरम्यान उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भातील याचिका निकाली काढली असून ‘पारनेर’ विक्रीचे संकट तूर्त टळले आहे.आता जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे दाखल केलेल्या याचिकेवर बारा जूनला सुनावणी होणार आहे.
पारनेर साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला होता व त्याची निविदा प्रसिध्द केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आ.विजय औटी व कामगार व शेतकऱ्यांच्या वतीने सुभाष बेलोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्री विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली होती. पूर्वीचे अवसायक अधिकाऱ्यांनी पारनेर कारखान्यावर २९ कोटीचे कर्ज दाखवले असतांना राज्य बँकेने मात्र ८० कोटींचे कर्ज निविदेमध्ये प्रसिध्द केले आहे अशी भूमिका न्यायालयात मांडली आहे. याचिकेवर सुनावणी झाल्यावर राज्य बँकेच्या वतीने न्यायालयात अद्याप याप्रकरणी कोणतीही निविदा दाखल झाली नसल्याने ही विक्री होणार नाही असे सांगितले.यावेळी राज्य बँक परस्पर कारखाना विक्री करेल असा धोका अण्णा हजारे,आमदार विजय औटी यांच्या वकिलांनी मांडल्यावर विक्री बाबत किंवा इतर निर्णयाबाबत राज्य बँक पुन्हा नोटीस काढेल असे राज्य बँकेने न्यायालयात स्पष्ट केले.न्यायालयाने याबाबतच्या तिन्ही याचिका निकाली काढल्या. विक्रीसाठीच्या निविदाच न आल्याने सध्याचे विक्रीचे संकट टळणार आहे.यामुळे कामगार,शेतकरी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
(तालुका प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची समिती निर्णय घेणार
राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने राज्य बँकेने विक्री करू नये ते सहकारी संस्थांना दीर्घ कालावधीच्या भाडेतत्वावर द्यावे असा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आग्रह धरला असून त्यामुळे पारनेरची विक्री होणार नाही. कृषिमंत्री विखे व माजी आमदार नंदकुमार झावरे यांची याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आली आहे़ ही समिती पारनेर कारखाना विक्रीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती जिल्हा काँगे्रसचे उपाध्यक्ष राहुल झावरे यांनी दिली़
प्राधिकरणाकडे याचिका
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायाधिकरणाकडे पारनेर साखर कारखान्याबाबत याचिका दाखल केली आहे.
त्याची सुनावणी गुरुवारी (दि़१२) होणार आहे. या सुणावणीत काय निर्णय होतो याकडे तालुक्याचे लक्ष आहे.