सैन्यदलातील भरतीसाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:17+5:302021-09-10T04:28:17+5:30

पाथर्डी : सैन्यदलात भरती होण्यासाठी पैसे स्वीकारून शाळेची बनावट कागदपत्रे, विविध दाखले तयार करणाऱ्यांवर पाथर्डी शहरात स्थानिक गुन्हे शाखा, ...

Crimes filed against those who forged documents for army recruitment | सैन्यदलातील भरतीसाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

सैन्यदलातील भरतीसाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

पाथर्डी : सैन्यदलात भरती होण्यासाठी पैसे स्वीकारून शाळेची बनावट कागदपत्रे, विविध दाखले तयार करणाऱ्यांवर पाथर्डी शहरात स्थानिक गुन्हे शाखा, मिलिटरी इंटेलिजन्स देवळाली कॅम्प (नाशिक) पोलिसांनी संयुक्तरीत्या बुधवारी सायंकाळी (दि. ८) ही कारवाई केली. यावेळी चौघे जण पैसे देऊन बनावट कागदपत्रे देत असल्याचे आढळून आले.

छापा घातलेल्या ठिकाणी बनावट कागदपत्रांचा दस्तऐवज, त्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. संत भगवानबाबा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय (अकोला, ता. पाथर्डी, जि. नगर), संत भगवानबाबा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय घाटशिळ पारगाव (ता. शिरूर कासार, जि. बीड), श्री नागनाथ विद्यालय (पिंपळगाव टप्पा, ता. पाथर्डी, जि. नगर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (चिंचपूर इजदे, ता. पाथर्डी, जि. नगर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मोहरी, ता. पाथर्डी, जि. नगर) या विद्यालयांचे बनावट दाखले, बनावट शिक्के आदी साहित्य आढळून आले.

यावेळी पोलिसांनी मारुती आनंदराव शिरसाठ यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता दत्तू नवनाथ गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी), कुंडलिक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), मच्छिंद्र कदम (रा. मानूर, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी संगनमताने एकत्र येऊन बनावट कागदपत्रे तयार केल्याचे सांगितले. यापूर्वी अजय ऊर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक), शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) यांना सैन्यदलामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला बनवून दिला असल्याचे शिरसाठ याने सांगितले. दाखल्यामध्ये त्यांचे नाव, जन्मदिनांक यामध्ये बदल करून बनावट दाखला दिला असल्याचे त्याने सांगितले.

याप्रकरणी मारुती आनंदराव शिरसाठ (वय ५२, रा. जांभळी, ता. पाथर्डी), दत्तू नवनाथ गर्जे (वय ४०, रा. अकोला, ता. पाथर्डी), कुंडलिक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), मच्छिंद्र कदम (रा. मानूर, ता. शिरूर कासार, जि. बीड), अजय ऊर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक), शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) यांनी एकत्र येऊन संगनमताने कट करून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार केले. ते दस्तऐवज खरे आहे असे भासवून त्याचा शासकीय कामासाठी गैरवापर करून सैन्यदलामध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याबाबत गुरुवारी पहाटे गुन्हा नोंदविण्यात आला.

----

दोघांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

आरोपी मारुती आनंदराव शिरसाठ व दतू नवनाथ गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी) यांना पोलिसांनी अटक केली. पाथर्डी न्यायालयातील न्यायाधीश सुशील देशमुख यांच्यासमोर हजर केले असता त्या दोघांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील प्रज्ञा गीते यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. पी. डांगे करत आहेत.

090921\img20210909090458.jpg

पाथर्डी शहरातील नाथ नगर मध्ये असलेल्या या दुमजली इमारती मधून बनावट दाखले देण्याचे काम आरोपी करत होते.

Web Title: Crimes filed against those who forged documents for army recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.