शेवगाव : कांद्याच्या दरासंदर्भात रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांवर शेवगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शेवगाव कृषी बाजार समितीत शनिवारी (दि. २३) दुपारी २ वाजता कांदा लिलाव सुरू असताना कमी दर मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दरवाढीसाठी अचानक बाजार समितीसमोरील पाथर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के यांनी इतर ठिकाणी मिळत असलेला दर येथेही देण्यात यावा, अशी व्यापाऱ्यांशी चर्चा केली व त्या दरची माहिती घेतली. व्यापाऱ्यांनी यास सहमती दर्शविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्याने जाणारी-येणारी वाहने अडवली व वाहतुकीस प्रतिबंध केल्याने पो. कॉं. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबादास आरोळे, महादेव मरकड, मुस्ताक शेख, रामा मरकड, गजानन मरकड, पप्पू पाखरे (सर्व, रा. मढी, ता. पाथर्डी) व इतर ८ ते १० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पो. ना. एस. आर. दराडे करीत आहेत.