काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षासह ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:19 IST2021-01-17T04:19:17+5:302021-01-17T04:19:17+5:30
कर्जत : तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे ...

काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षासह ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा
कर्जत : तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे यांच्यासह ७० ते ८० जणांवर कर्जत पोलिसांत विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. दुसरी फिर्याद पोलिसांनीच दिली असून, त्यावरून स्थापलिंग पॅनेलप्रमुख प्रा. शहाजी देवकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तातडीने घटनास्थळी हजर झाल्याने अनर्थ टळला. त्यांची चाहूल लागताच हल्लेखोर पळून गेले. या मारहाणीप्रकरणी सतीश देवकर (रा. वाघनळी, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली. सतीश देवकर हे चुलते प्रा. शहाजी देवकर, चुलतभाऊ रोहित देवकर, पोलीस कर्मचारी विक्की डेहनकर व वाहनचालक बाबा सुरवशे हे राशीन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करीत होते. त्यावेळी ॲड. कैलास शेवाळे यांच्यासह ७० ते ८० लोक तेथे आले. यावेळी शेवाळे यांनी सतीश देवकर, प्रा. शहाजी देवकर आणि रोहित देवकर यांना मारहाण करीत गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल चोरून नेला आहे.
या फिर्यादीवरून ॲड. कैलास शेवाळे यांच्यासह सत्तर ते ऐंशी जणांवर मारहाणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने करीत आहेत.
दुसरी फिर्याद पोलीस कर्मचारी अमित बरडे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी वाघनळी येथे स्थापलिंग पॅनेलप्रमुख प्रा. शहाजी देवकर यांच्या घरी सोळा (बाउंसर) पहिलवान आणल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी भेट दिली असता त्यात तथ्य आढळले. यावरून देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस काॅन्स्टेबल हंचे करीत आहेत.