शेवगाव : महिलेसह तिच्या पतीला धमकाविल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व शेवगावचे नगरसेवक अशोक आहुजा यांच्यासह सहा जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.याबाबत इंदिरा सुधीर बाबर (रा. माळीगल्ली, शेवगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, १६ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मला शिवीगाळ व धक्काबुकी करून तुमच्या सर्व परिवारास संपवून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर मी तक्रार देण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यात गेले असता अशोक आहुजा यांनी मला व माझे पती सुधीर बाबर यांना शिवीगाळ करून तुमच्यावर खोटी केस दाखल करीन, दोघा नवरा, बायकोला जेलमध्ये टाकीन, अशी धमकी दिली. या फिर्यादीनुसार आहुजा यांच्यासह अजय गाढेकर, मीनाबाई गाढेकर, सरला लद्दे, बाळासाहेब लद्दे (सर्व रा. शेवगाव व प्रदीप पवार (रा. औरंगाबाद) यांच्याविरु द्ध सहा जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर दराडे करीत आहेत.दरम्यान, याच प्रकरणावरून आहुजा यांच्या समर्थनार्थ भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेवगाव बंद करून रास्ता रोको आंदोलन केले होते. तर दुस-या गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक ओमासे यांच्यावर एकतर्फी कारवाई करू नये, असे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले होते. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय झाला होता. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नगर भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षासह सहा जणांविरुद्ध धमकाविल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:24 IST