इमामपूर परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:54+5:302021-02-26T04:30:54+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर परिसरातील डोंगररांगांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी ...

इमामपूर परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करा
केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर परिसरातील डोंगररांगांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
वनविभागाला दिलेल्या निवेदनात मोकाटे यांनी इमामपूर परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत असून वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे डोंगररांगांमध्ये पाणवठे तयार करून त्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली आहे. इमामपूर तसेच जेऊर गावच्या चोहोबाजूंनी गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात आहेत. या डोंगररांगांमध्ये हरीण, काळवीट, लांडगे, ससा, कोल्हे, खोकड, तरस, साळींदर, मोर याचबरोबर विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. या डोंगररांगांमध्ये बिबट्यानेही अनेक वेळा दर्शन दिले आहे.
सद्य:स्थितीत डोंगररांगांमधील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसून येत आहेत. मानवी वस्तीवर आलेल्या वन्यप्राण्यांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात तसेच रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे प्रकार परिसरात अनेक वेळेस घडलेले आहेत. त्यामुळे वनविभागाकडून तत्काळ पाणवठे बनवून वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी केली आहे.
----
जेऊर परिसरात बहिरवाडी येथे ३ पाणवठे, धनगरवाडी २, ससेवाडी १, डोंगरगण १, खोसपुरी १, चापेवाडी परिसरात १ असे पाणवठे बनविण्यात आलेले आहेत. जेऊर परिसरात बहुतेक ठिकाणी अद्याप डोंगररांगांमध्ये पाणी उपलब्ध आहे. इमामपूर परिसरात पाहणी करून वन्यप्राण्यांच्या, पाण्याची सोय करण्यात येईल.
- मनेष जाधव,
वनपाल, जेऊर वनविभाग