वेडसर महिलेला पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:05+5:302021-03-10T04:21:05+5:30
अळकुटी : येथील अळकुटी-पारनेर रस्त्यावरील संत सावता माळी मंदिराजवळ सोमवारी रात्री दीड वाजता एक वेडसर महिला आढळून आली होती. ...

वेडसर महिलेला पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचविले
अळकुटी : येथील अळकुटी-पारनेर रस्त्यावरील संत सावता माळी मंदिराजवळ सोमवारी रात्री दीड वाजता एक वेडसर महिला आढळून आली होती. तिला येथील तरुणांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तिला तिच्या नातेवाइकाकडे सुखरूप घरी पोहोचविले. तरुणांच्या व पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
संत सावता माळी मंदिराजवळील घोलप मळा या ठिकाणी एक महिला आढळून आली. त्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तीही होत्या. त्या महिलेसोबत ते चर्चा करीत होते, परंतु महिला घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात येताच, येथील युवक तुषार घोलप यांनी अतुल घोलप, स्वप्निल घोलप यांना फोनद्वारे माहिती दिली. त्या ठिकाणी त्यांनीही धाव घेत सदर घटनेची माहिती अळकुटी बीटचे हेड कॉन्स्टेबल उजागरे यांना कळविली. त्यांनी पेट्रोलियमवर असलेल्या पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांना माहिती कळविली. त्यानंतर, ते दोन अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणावरून निघून गेले, तर काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळी आले. सदर महिलेची माहिती घेतली असता, ही महिला तालुक्यातील देविभोयरे येथील असल्याचे व ती वेडसर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, तिला अळकुटी येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले. यानंतर, सदर महिलेला देवीभोयरे येथील कुटुंबाकडे सुखरूप पोहोच केले, असे बोठे यांनी सांगितले.