जिल्हा बँकेसाठी विखे-थोरात समर्थकांची छुपी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:48+5:302021-01-17T04:18:48+5:30

श्रीगोंदा : जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातून बँकेत प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी पाठविण्यासाठी बाळासाहेब थोरात व ...

Covert front formation of Vikhe-Thorat supporters for District Bank | जिल्हा बँकेसाठी विखे-थोरात समर्थकांची छुपी मोर्चेबांधणी

जिल्हा बँकेसाठी विखे-थोरात समर्थकांची छुपी मोर्चेबांधणी

श्रीगोंदा : जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातून बँकेत प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी पाठविण्यासाठी बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे समर्थकांनी छुप्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सेवा सोसायटी मतदारसंघात विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे व माजी आमदार राहुल जगताप यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

प्रवरानगर-संगमनेरवरून काय संदेश येतो यावर वारे वाहत आहे. तालुक्यातील जिल्हा बँकेचा इतिहास पाहिला, तर स्व. शिवाजीराव नागवडे व स्व. कुंडलिकराव जगताप यांचे हुकमी वर्चस्व राहिले आहे. यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांची नेहमीच निर्णायक भूमिका राहिली. जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत दत्तात्रय पानसरे यांनी आमदार बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते यांच्या मदतीने जिल्हा बँकेत एंट्री केली. या लढाईत दत्तात्रय पानसरे यांना ७३, तर प्रेमराज भोयटे यांना ३९ मते मिळाली होती. यामध्ये बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी पानसरेंच्या विजयी रथाचे सारथ्य केले होते.

तालुक्यात शेतकऱ्यांना ३६४ कोटींची कर्जमाफी झाली. त्यानंतरही पुन्हा विक्रमी कर्जवितरण केले गेले. यामध्ये दत्तात्रय पानसरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगितले जाते. निवडणुकीत विखे व थोरात गट आमने-सामने आले, तर श्रीगोंद्यात नागवडे व जगताप गटला फायदा होईल, असा अंदाज आहे. जगताप व नागवडे यांना एकत्र आणण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, सुरेश लोखंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत तडजोडीचा फाॅर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे पानसरे-नाहाटांनी वेगळ्या पद्धतीने डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे.

कुकडी साखर कारखाण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांनी जिल्हा बँकेतील प्रवेशासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंदा सेवा सोसायटी मतदारसंघात राहुल जगताप व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यात सरळ सामना होणार आहे.

---

..तर अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते असतील उमेदवार

जगताप व नागवडे यांच्यातील तडजोडीच्या राजकारणात अनुराधा नागवडे यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अनुराधा नागवडे यांना थोरात गटाने पुढे केले, तर विखे गटाकडून प्रतिभा पाचपुते यांचे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. अशा परिस्थितीत पानसरेंसाठी आमदार बबनराव पाचपुते व बाळासाहेब नाहाटा हे कशी फिल्डिंग लावतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Covert front formation of Vikhe-Thorat supporters for District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.