जलयुक्त योजनेत भ्रष्टाचार
By Admin | Updated: October 4, 2016 00:45 IST2016-10-04T00:20:33+5:302016-10-04T00:45:39+5:30
अहमदनगर : राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना ‘झोलयुक्त’ शिवार योजना आहे. अधिकारी पातळीवर राबविलेल्या या योजनेत भ्रष्टाचार आहे.

जलयुक्त योजनेत भ्रष्टाचार
अहमदनगर : राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना ‘झोलयुक्त’ शिवार योजना आहे. अधिकारी पातळीवर राबविलेल्या या योजनेत भ्रष्टाचार आहे. राज्यातील मुसळधार पावसात ‘जलयुक्त’चे काय-काय वाहून गेले?,हे लवकर दिसणार आहे. नगर जिल्ह्यातही जलयुक्तच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, राज्यभर मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजना नाचवित होते. मात्र या योजनेबाबत खुलासा करण्याची वेळ सरकारवर येणार आहे. या योजनेत जनतेचा पैसा वाया गेला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. मात्र, शेतकऱ्यांची पाणी अडविण्याची साधने वाहून गेली, हे दुर्दैवी आहे. नगर जिल्ह्यातील योजनेच्या कामात भष्ट्रचार झाल्याच्या तक्रारी असून त्याची चौकशी होणार आहेत.
मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन सर्वत्र पुराचे थैमान असून अतिवृष्टीची दाहकता मोठी आहे. पुढील आठवड्यात पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. पूरग्रस्तांसाठी तातडीने अन्नछत्र सुरू करावेत. स्थलांतरित कुटूंबांना निवारा देऊन त्यांना आरोग्य सुविधा द्यावी. पूरग्रस्त भागात प्रशासन चांगले काम करीत आहे. मात्र, त्यात आणखीा सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकांला पुराचा फटका बसला असून सरकारने तत्काळ विनाविलंब कर्ज माफीची घोषणा करावी. रखडलेल्या रब्बी दुष्काळी अनुदानासाठी धरणाच्या लाभक्षेत्राची अट सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपासून धरणे कोरडी असल्याने ही अट शिथील करुन अनुदान द्यावे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणार असल्याचे विखे म्हणाले. (प्रतिनिधी)