सभेत मुंडण करुन नगरसेवकाने केला पालिकेचा निषेध
By Admin | Updated: June 7, 2016 23:32 IST2016-06-07T23:25:00+5:302016-06-07T23:32:57+5:30
पाथर्डी :नगरसेवक बजरंग घोडके यांनी निषेध म्हणून मंगळवारी पालिका सभेत मुंडण केले.

सभेत मुंडण करुन नगरसेवकाने केला पालिकेचा निषेध
पाथर्डी : रामगिरबाबा आघाडीचे नगरसेवक बजरंग घोडके यांनी शहराचा पाणीप्रश्न तसेच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याबाबत पालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून मंगळवारी पालिका सभेत मुंडण केले. पालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे कृत्य करुन निषेधाची घटना घडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेंद्र उदमले होते. सभा सुरू होतांनाच रामगिर बाबा आघाडीचे नगरसेवक बजरंग घोडके यांनी शहरातील पाणी टंचाईकडे लक्ष वेधून याकडे पालिका डोळेझाक करीत असल्याचा आरोप केला. दोन वर्षापूर्वी स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा शहरात बसविण्यासंदर्भात ठराव करुनही अद्याप कार्यवाही झाली नाही याकडे लक्ष वेधले.
याचा निषेध म्हणून त्यांनी भर सभेतच मुंडण केले. त्यानंतर घोडके यांनी सर्व ठराव मंजूर असे सांगितले. विरोधी आघाडीचे नगरसेवक डॉ.दीपक देशमुख यांनी सभेतील विषयांवर चर्चा करण्याची मागणी करीत अध्यक्षांकडे आपला विरोध असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांचे म्हणणे प्रोसिडींगला घेण्यास भाग पाडले व नगराध्यक्ष उदमले यांना धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्ष उदमले यांनी सर्वांची कामे विचारात घेतली जातील, असे आश्वासन दिले.
सभेस उपनगराध्यक्ष बंडू बोरूडे, नगरसेवक नंदकुमार शेळके, प्रमोद भांडकर, बजरंग घोडके, संजय भागवत, मंगलताई कोकाटे, सुरेखा गोरे, जनाबाई घोडके, प्रियंका काळोखे, डॉ.शारदा गर्जे, दीपाली बंग, चाँद मनियार, मुख्याधिकारी नानासाहेब महारनोर हजर होते.
(तालुका प्रतिनिधी)
पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्यात अडथळे येत होते. तरीही नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. त्याचा पाठपुरावा करून पुतळा शहरात उभारला जाईल.
-राजेंद्र उदमले, नगराध्यक्ष ,बंडू बोरूडे, उपनगराध्यक्ष