नगरसेवकावर खुनी हल्ला
By Admin | Updated: April 1, 2017 03:49 IST2017-04-01T03:49:52+5:302017-04-01T03:49:52+5:30
जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या कारणावरून सत्ताधारी नगरसेवक गणेश आजबे

नगरसेवकावर खुनी हल्ला
जामखेड (अहमदनगर) : जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या कारणावरून सत्ताधारी नगरसेवक गणेश आजबे यांना बंदुक, तलवारीचा धाक दाखवून त्यांच्यावर गज व काठीने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये आजबे गंभीर जखमी झाले असून जामखेड पोलिसांनी नगराध्यक्षांच्या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
२९ मार्च रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास फिर्यादी नगरसेवक गणेश आजबे हे शहरातील मेनरोड येथील आजबे वाडा येथे होते. या वेळी आरोपी नगराध्यक्षांचा पती विकास राळेभात, प्रशांत राळेभात, पप्पू राळेभात, मनोज राळेभात, विकास राळेभात व प्रतिक राळेभात यांनी आजबे यांना घेरले. ‘माझ्या पत्नीविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी गेला होतास काय,’ असे दटावत विकासने त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखत जिवे मारण्याची धमकी दिली. अन्य आरोपींनी त्यांना लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने मारहाण करीत तलवारीने मारून टाकण्याची धमकी दिली. एकाने गळ्यातील तीन तोळे सोन्याची साखळी, पाच ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले, असे नगरसेवक आजबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षा प्रीती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी १६ नगरसेवक आठ दिवसांपासून अज्ञातस्थळी गेले होते. यामध्ये सत्ताधारी गटातील नऊ जणांचा समावेश होता. अविश्वास ठरावासाठी यातील काही नगरसेवकांचे एकमत झाले नसल्याने अखेर हा अविश्वास ठराव बारगळला व यातील काही नगरसेवक पुन्हा जामखेड येथे दाखल झाले.