मनपाची वर्षाकाठी तीन कोटींची होणार बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:40+5:302021-02-25T04:25:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, प्रयोगिक तत्त्वावर श्रमिकनगर येथे आठ ...

मनपाची वर्षाकाठी तीन कोटींची होणार बचत
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, प्रयोगिक तत्त्वावर श्रमिकनगर येथे आठ एलईडी दिवे बसविण्यात आले आहे. तुलनात्मक अभ्यास करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेची सुमारे ती कोटींची बचत होणार असल्याचे विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.
शहर व परिसरातील दिवाबत्तीवर महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र त्या तुलनेत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. दिवाबत्तीबाबत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत. शहर व परिसरातील काही रस्त्यांवर अद्याप दिवे बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अंधार आहे, यावर महापालिकेने स्मार्ट एलईडी प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्वीच झालेला आहे. परंतु. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. तिसऱ्यांदा निविदा प्रसिध्द केल्यानंतर पुणे येथील क्युबिक कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे. या कंपनीने सावेडी उपनगरातील श्रमिकनगर येथे आठ एलईडी दिवे बसविले आहेत. सोडीयम व एलईडी दिव्यांना किती वीज लागते, याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे.
..
अशी होणार बचत
महापालिकेला विद्युत साहित्यासाठी वर्षाकाठी एक कोटी २५ लाख रुपये खर्च येतो. तसेच महिन्याला ३८ लाख रुपये विजबिल भरावे लागते. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ कोटी ५० लाख रुपये खर्च येतो. विकासकाकडून पूर्वीचे दिवे बदलून त्याजागी नवीन एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यामुळे अंदाजे ५० टक्के विज बिलाची बचत होईल. हे दिवे बसविल्यानंतर जे बिल येईल, त्याच्या ५० टक्के रक्कम विकासक महापालिकेला देईल, असा हा करार करण्यात आला आहे.
....