रसवंतीगृह चालकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ : दीड वर्षापासून रोजगार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 16:45 IST2021-05-22T16:32:25+5:302021-05-22T16:45:52+5:30
राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

रसवंतीगृह चालकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ : दीड वर्षापासून रोजगार बंद
राहुरी : राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
राहुरी ते शनिशिंगणापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृह आहे. मात्र, कोरोनामुळे रसवंतीगृह बंद करावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी व युवक यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या रसवंतीगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे बैल आणि बैलांच्या चरख्याच्या साह्याने उसाचा रस काढला जातो. पुणे, मुंबई तसेच देशाबाहेरील पर्यटकांना उसाचा रस खूप भावतो. यंत्रापेक्षा लाकडी चरख्याच्या साहाय्याने काढलेला ऊसरस आरोग्यदायी आहे, असे मानले जाते. त्यामुळे लाकडी रसवंतीवर काढलेल्या उसाच्या रसाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे रसवंतीगृह बंद पडल्यामुळे अनेक शेतकरी व युवक यांचा व्यवसाय रसवंतीगृहांवर अवलंबून होता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नगर-मनमाड रोडवरही ठिकठिकाणी रसवंतीगृह सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृहांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी भाविक येण्याचे प्रमाण घटल्याने त्याशिवाय लॉकडाऊन असल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. रोजगाराची साधनेही बुडाली आहे.
लॉकडाऊन नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकरी व व्यापारीवर्गावर आली आहे. पंधरा वर्षांपासून मी रसवंतीचा व्यवसाय करत आहे. कोरोनाचे सावट आल्याने पंधरा वर्षांत पहिल्यांदाच रसवंतीगृह बंद आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम करण्याची इच्छा असूनदेखील कोरोनासारख्या महामारीमुळे दुसरीकडे कोठेही रोजगार उपलब्ध होत नाही.
- सचिन निक्रड, रसवंतीचालक, राहुरी खुर्द