कोरोना रुग्णांच्या आर्थिक लुटीविरुद्ध आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:51+5:302021-06-02T04:16:51+5:30
नाशिक येथे रुग्णालयांच्या लुटमारीविरोधात अर्धनग्न आंदोलन करून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्या ...

कोरोना रुग्णांच्या आर्थिक लुटीविरुद्ध आंदोलनाचा इशारा
नाशिक येथे रुग्णालयांच्या लुटमारीविरोधात अर्धनग्न आंदोलन करून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर येथे बैठक घेण्यात आली. यात काही खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली. बैठकीत डुंगरवाल बोलत होते.
गेल्या दीड वर्षापासून जनता कोरोना महामारीने त्रस्त आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांना गमावले, तर अनेक कुटुंबांचे प्रमुख हे या महामारीमध्ये मृत्यू पावले. उपचार मिळवण्यासाठी लोक वणवण फिरत आपल्या रुग्णाला चांगली आरोग्यसुविधा मिळावी या उद्देशाने प्रयत्न करत असतात; परंतु काही खासगी रुग्णालयांत उपचाराच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप तिलक डुंगरवाल यांनी केला.
यावेळी भावे यांनी रुग्णालयात होणाऱ्या आर्थिक लुटीची सविस्तर माहिती दिली, तसेच ज्यांना जादा बिल आकारणी झाली आहे, त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
येत्या काळात जर रुग्णांची आर्थिक लूट थांबली नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
बैठकीस आपचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा प्रवक्ते प्रवीण जमदाडे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडिले, भरत डेंगळे, राहुल केदार, किरण गायकवाड, दीपक परदेशी, किरण डेंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.