प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना टेस्ट किट संपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:17+5:302021-04-19T04:18:17+5:30
आपला कोरोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे. हे समजण्यासाठी नागरिकांना सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सध्या पिंपळगाव पिसा ...

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना टेस्ट किट संपल्या
आपला कोरोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे. हे समजण्यासाठी नागरिकांना सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सध्या पिंपळगाव पिसा येथे १०७ कोरोना रुग्ण ॲक्टिव आहेत. विसापूर परिसरात पिंपळगाव पिसा, खरातवाडी, विसापूर, निंबवी, एरंडोली, कोरेगव्हाण, चांभूर्डी, सारोळा सोमवंशी, उख्खलगाव, सुरेगाव, मुंगुसगाव व घुटेवाडी या सर्व गावांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा त्रिशतकी आकडा पार झालेला आहे.
कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढणारा आकडा पाहता कोरोना तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशयित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करत आहेत. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दोन हजार लोकांना कोरोना लस मिळाली आहे. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र ३० किलोमीटर अंतरावर गव्हाणवाडीपर्यंत आहे. मात्र या आरोग्य केंद्रापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील मुंगुसगाव बारा किलोमीटर अंतरावरील कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे.
कोरोना तपासणी करण्यासाठी लोकांना ३० किलोमीटरवरुन येऊन आल्या पावली परत माघारी फिरण्याची वेळ येत आहे. शनिवारी पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. त्यावेळी तेथे २२ किलोमीटरवरुन महिला व पुरुष कोरोना तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र कोरोना तपासणी किट उपलब्ध नसल्याने त्या जोडप्यासह अनेक लोकांना परत जावे लागले. अधिक चौकशी केली असता अशीच परिस्थिती कोळगाव व बेलवंडी आरोग्य केंद्रात होती.