कोपरगाव : टेस्ट करण्याच्या वेळा मर्यादित असल्याने, संशयित रुग्ण टेस्ट करण्यापासून वंचित राहतात. दुसऱ्या दिवसाची वाट पहाण्यापर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग पसरला जातो, त्यामुळे टेस्ट करण्याच्या वेळा वाढविण्यात याव्या, तसेच एचआरसीटी करण्यासाठी आकारण्यात येणारी तपासणी कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
कोल्हे म्हणाल्या, सध्या कोविड रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, रॅपिड टेस्ट करण्यासाठी गर्दी वाढत आहे. रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या या टेस्टच्या वेळा मर्यादित ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे रांगेत उभे राहून टेस्ट न झाल्यामुळे वंंचित राहतात. टेस्टसाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहत घरी थांबतात. असे अनेक रुग्ण असल्याने ते इतरांच्या संपर्कात येउन कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. त्यामुळे या तपासणीच्या वेळेमध्ये वाढ करण्याची गरज आहे, त्यामुळे रुग्णवाढीला आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, या आजारासाठी एचआरसीटी तपासणी करण्याची वारंवार गरज पडते. या तपासणीची फी जास्त प्रमाणात असल्यामुळे अगोदरच विवंचनेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता सदरची तपासणी फीची रक्कम कमी करण्यात यावी.