श्रीगोंद्यातील २५ गावे २१ वाड्यांतून कोरोना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:23+5:302021-06-02T04:17:23+5:30

श्रीगोंदा : तालुका प्रशासन आणि कोविड सेंटर चालकांनी जबरदस्त मेहनत घेतल्याने श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक थंडावला आहे. तालुक्यातील २५ ...

Corona deported from 25 villages and 21 hamlets in Shrigonda | श्रीगोंद्यातील २५ गावे २१ वाड्यांतून कोरोना हद्दपार

श्रीगोंद्यातील २५ गावे २१ वाड्यांतून कोरोना हद्दपार

श्रीगोंदा : तालुका प्रशासन आणि कोविड सेंटर चालकांनी जबरदस्त मेहनत घेतल्याने श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक थंडावला आहे. तालुक्यातील २५ गावे व २१ वाड्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. मात्र, या महामारीत २१६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर सध्या ६३६ जण कोरोनाशी झुंज देत आहेत.

तालुक्याची लोकसंख्या ३ लाख २० हजार ६७५ जणांपैकी ५८ हजार ८५३ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार ८७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. १० हजार ११८ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात १६ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे १ हजार ५०० जणांना जीवदान मिळाले. या कोविड सेंटरमुळे नागरिकांचा सुमारे ३ कोटींचा वैद्यकीय खर्च वाचला असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

प्रशासनाने ३४ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण केले आहे. १ जूनपासून घारगाव, आढळगाव, मांडवगण, संत शेख महंमद महाराज ( श्रीगोंदा), मढेवडगाव ही कोविड सेंटर बंद झाली आहेत.

एप्रिल महिन्यात कोराेनाची चाचणी केलेल्या रुग्णांमध्ये १८ टक्के रुग्ण कोरोनाबाधित निघत होते. मेअखेर हे प्रमाण ७ टक्केवर आले आहे, १५ जूनअखेर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरणार आहे.

...........................

सामूहिक यश

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची साखळी कशी तोडावी याबाबत मोठे आव्हान होते. मात्र, तालुक्यातील नागरिक, संस्था पदाधिकारी यांनी भरीव सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, हे सामूहिक यश आहे.

-स्वाती दाभाडे, प्रांताधिकारी, श्रीगोंदा.

.............

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे, तसेच वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

-डॉ. नितीन खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी.

.............

कोरोनामुक्त गावे आणि वाड्या

डोकेवाडी, गव्हाणेवाडी, कोकणगाव, चोराचीवाडी, भिंगाण, वेळू, टाकळी कडेवळीत, आधोरेवाडी, महादेववाडी, उक्कडगाव, रायगव्हाण, वडगाव, शिंदोडी, दाणेवाडी, मेंगलवाडी, शिपलकरवाडी, अजनुज, आर्वी, जंगलेवाडी, म्हातारपिंप्री, पांढरेवाडी, लगडवाडी, भापकरवाडी, वेठेकरवाडी, घुटेवाडी, मुंगूसगाव, भानगाव, चिखली, कोरेगाव, घारगाव, घोटवी, बांगर्डे, बनपिंपरी, थिटे सांगवी, उख्खलगाव, निंबवी, कोरेगव्हाण, सारोळा सोमवंशी, गव्हाणेवाडी, महादेववाडी (लोणी व्यंकनाथ), खेतमाळीसवाडी, शिरसगाव बोडखा, डोमाळेवाडी, चोरमलेवाडी, मासाळवाडी.

Web Title: Corona deported from 25 villages and 21 hamlets in Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.