ग्रामीण भागात कोरोना स्थिती भयावह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:14+5:302021-05-07T04:21:14+5:30
आमदार कानडे यांनी मतदारसंघातील मुसळवाडी, खुडसरगाव, मालुंजा, माहेगाव, भेर्डापूर, पढेगाव आदी ठिकाणी भेटी देऊन आरोग्य कर्मचारी व तेथील ...

ग्रामीण भागात कोरोना स्थिती भयावह
आमदार कानडे यांनी मतदारसंघातील मुसळवाडी, खुडसरगाव, मालुंजा, माहेगाव, भेर्डापूर, पढेगाव आदी ठिकाणी भेटी देऊन आरोग्य कर्मचारी व तेथील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
मुसळवाडी, गोंडेगाव, कान्हेगाव आदी गावांमध्ये प्रत्येक गावात १० ते १५ पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन गावोगावच्या रुग्ण कल्याण समित्या सक्रिय केल्या जात आहेत. आरोग्य विभागामार्फत आशासेविका, ग्रामसेवक आणि शिक्षकांच्या मदतीने घरोघर जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. घरातच उपचार घेणा-या बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत, असे यावेळी कानडे यांनी सांगितले.
पहिल्या लाटेमध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा शिरकाव झाला नव्हता. शेतीची कामे सुरळीत चालू होती. तथापि, या दुस-या लाटेमध्ये गावोगाव रुग्णांची संख्या वाढल्याने कुणीही माणूस बाहेर पडण्यास धजावत नाही. तालुकास्तरावरील सर्व अधिका-यांनी ग्रामीण भागातील दौरे वाढवावेत, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसेच रुग्णांना कोविड उपचार केंद्रामध्ये बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी तहसील कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या कक्षाकडे विचारणा करावी, असे आवाहन आमदार कानडे यांनी केले.