कोरोनामुळे लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:41+5:302021-09-02T04:45:41+5:30
संगमनेर : कोरोनामुळे नियोजित वधू आणि वराच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. आपला मुलगा अथवा मुलीला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळण्यासाठी ...

कोरोनामुळे लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या
संगमनेर : कोरोनामुळे नियोजित वधू आणि वराच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. आपला मुलगा अथवा मुलीला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळण्यासाठी सर्वच पालक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना यश आल्यास ते आनंदी होतात, त्यांना धन्यता वाटते. मात्र, अपयश आल्यास ते दु:खी होतात. आपण जी कृती करतो, त्यात सहजता नसते, अट्टाहास असतो. आनंद नसतो, अपेक्षा असते. त्यामुळे आपला विरस होतो.
संगमनेरातील विवाह सल्लागार संदीप शेळके यांनी सांगितले की, सर्वच पालक त्यांच्या पाल्यांच्या आयुष्याचा चांगला जोडीदार मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात, सतत धडपड करीत असतात. मुलगा अथवा मुलीला चांगला जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न करताना, तो आनंदाने करायला हवा. अनेक पालक प्रत्येकक्षणी बेचैन राहतात. त्यामुळे आपले पाल्य सुद्धा सतत बैचेन राहतात. ‘मुलगा, मुलीला खूप स्थळे येतात. पण सगळे पाहुणे घरी पाहून गेले की, त्यांचा नकार येतो.’ असे काही पालक सांगतात. मात्र, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले की, त्यांच्याकडे जेव्हा पाहुणे येतात, तेव्हा ते एक पालक आहोत हे विसरून गेले.
आपण अभियंता, डॉक्टर, मोठे व्यावसायिक यापेक्षाही आपण लग्नासाठीच्या मुला, मुलीचे पालक आहोत. ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. फोनवर संभाषण करत असताना समोरील व्यक्तीचा आदर ठेवूनच बोलावे. आपल्याला आपल्या स्थळासाठी इतर पालकांचे फोन येतात, तेव्हा आपण त्यांच्याशी पालक म्हणून बोलले पाहिजे. आपण आपल्या घरी किती मोठे आहात, आपण कोणत्या मोठ्या पदावर आहात, हा अहंभाव बोलताना असू नये. आपण ज्या पदावर असतो, त्याच पदांमध्ये सगळीकडे वावरत असतो. आपण पालक आहोत, हे आपण विसरून जातो.
-----------
नंतरही होऊ शकते चौकशी
कोरोनामुळे सध्या काही मर्यादा आल्या आहेत. लग्नासाठी एखाद्या स्थळाची माहिती घेत असताना, बोलणी करताना बरेच बोलणे हे फाेनवर, व्हिडीओ कॉलवर होते. मुलाला किती पगार आहे, शेती किती आहे, फ्लॅट आहे का, इतर काही प्रॉपर्टी आहे का, असे प्रश्न फोनवरूनच लगेचच विचारले जातात. मुळात या गोष्टी तुम्ही नंतरही चौकशी करून माहिती करून घेऊ शकता.
-------------
बोलताना, आम्ही खूप मोठे आहोत, असा अहंभाव बोलण्यातून दाखवू नये. अनेक पालक आमच्या मुलीच्या लग्नाला आम्ही एवढा खर्च केला, तिचे लग्न अमुक-अमुक कार्यालयात केले होते, पुण्यात बस्ता बांधला होता... अशा अनेक गोष्टींची फोनवरच चर्चा करतात. यातून आम्ही किती मोठे आहोत, हे बोलताना दाखवत असतात. त्यामुळे समोरचा पुन्हा त्या स्थळासाठी फोन करत नाही. मुळात इतरांकडे काय आहे यापेक्षा आपल्या पाल्याला अनुरूप चांगला जोडीदार मिळणे हे महत्त्वाचे आहे. त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, यावर लग्न यशस्वी होत नाही.
- संदीप शेळके, विवाह सल्लागार, संगमनेर
..................
star 1125