विरोधी पक्षनेता पदाबाबत कर्डिले करणार मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:54+5:302021-07-26T04:20:54+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच आहे. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी ...

Cordille will mediate on the post of Leader of the Opposition | विरोधी पक्षनेता पदाबाबत कर्डिले करणार मध्यस्थी

विरोधी पक्षनेता पदाबाबत कर्डिले करणार मध्यस्थी

अहमदनगर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच आहे. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता पदासाठी कर्डिले कुणाच्या नावाची शिफारस करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. संख्याबळानुसार सर्वात मोठा विरोधी पक्ष भाजप आहे. भाजपने या पदावर दावा केला आहे. तसे पत्र भाजपाच्या गटनेत्या मालन ढोणे यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांना दिले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पाटील हे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले होते. त्यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होईल, अशी अशा नगरसेवक बाळगून होते; परंतु पाटील यांनी येत्या २ ऑगस्ट रोजी पुणे येथे बैठक बोलविली आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेता पदावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. तत्पूर्वी माजी आमदार शिवाजी कर्डिले नगरसेवकांची मते जाणून घेतील. या पदासाठी कोण कोण इच्छुक आहेत. त्यांच्याबाबत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे, याबाबतची सविस्तर माहितीही कर्डिले यांनी बैठकीत सादर करावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष पाटील केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत माजी आमदार कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज काेतकर आणि शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे हे इच्छुक आहेत. विरोधी पक्षनेता नेमणुकीचे अधिकार महापौरांना आहेत. महापौर शेंडगे यांनी माजी महापौर वाकळे यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती केल्याची चर्चा होती; परंतु पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्याने वाकळे यांची नेमणूक थांबविण्यात आली. त्यामुळे भाजपमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून वाद निर्माण झाला असून, त्यावर येत्या ऑगस्टमध्ये निर्णय होणार आहे.

.....

- महापालिकेच्या विरोधी पक्षनेते नेते पदाबाबत नगरसेवकांचे काय म्हणणे आहे, ते जाणून घ्या. आणि बैठकीत सविस्तर भूमिका मांडावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येकाचे मत जाणून घेऊन माहिती देणार आहे.

- शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार, भाजप

....

Web Title: Cordille will mediate on the post of Leader of the Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.