VIDEO - कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीनही आरोपी दोषी, २१ नोव्हेंबरला शिक्षेवर सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 14:17 IST2017-11-18T11:52:26+5:302017-11-18T14:17:54+5:30
कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी (दि़ १८) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २१ व २२ नोव्हेंबरला या खटल्यातील शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी ठेवली आहे.

VIDEO - कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीनही आरोपी दोषी, २१ नोव्हेंबरला शिक्षेवर सुनावणी
अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी (दि़ १८) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २१ व २२ नोव्हेंबरला या खटल्यातील शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी ठेवली आहे. प्रमुख आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे याला अत्याचार खून या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले आहे तर आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना संगनमत करुन कट करणे व गुन्ह्यासाठी प्रोत्साहीत करणे यासाठी दोषी ठरवले आहे.
बाललैंगिंक कायद्यानुसारही तिघांना दोषी ठरविण्यात आले आहे. खून व अत्याचाराच्या गुन्ह्यात फाशी व जन्मठेपेची तरतूद असून, कट रचणे व गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी जन्मठेपेची तरतूद आहे, असे न्यायालयाने सांगितले. २१ नोंव्हेबरला नितीन भैलुमे याच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यासाठी तर २२ नोव्हेंबरला जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी होणार आहे.
कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २९), संतोष गोरख भवाळ (२९) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२८) यांना अटक करुन त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळवून दोषारोप पत्र ठेवले होते. याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पीठापुढे झाली. आरोपी व सरकारी पक्षाने आपापल्या बाजू मांडल्या असून, साक्षीपुरावे तपासून आज आरोपींवरील दोष सिद्ध होण्यासाठी थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
न्यायालयातील बंदोबस्त पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात तर कोपर्डी येथील बंदोबस्त श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नियंत्रणाखाली तैनात करण्यात आला. खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन न्यायालय व्यवस्थापनाने बाहेरील नागरिकांसाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली होती. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयातही मोठी गर्दी झाली. त्यामुळे न्यायालयासह नगर शहर व कोपर्डीत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.
नगर शहरातील बंदोबस्त सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आहे. अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील बंदोबस्तावर देखरेख करत आहेत. बंदोबस्त अधिकारी व बीडीएस पथकाने न्यायालय परिसराची तपासणी केली असून, शनिवारी न्यायालयात प्रवेश करणा-या व्यक्ती व वाहनांची तपासणी करण्यात आली. आरोपींवर न्यायालय परिसरात आधी तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली.