तांबेंचा बेरोजगार दिन म्हणजे पोरकटपणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:49+5:302021-09-18T04:22:49+5:30
कोपरगाव : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिन साजरा ...

तांबेंचा बेरोजगार दिन म्हणजे पोरकटपणा !
कोपरगाव : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
वहाडणे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणाऱ्या पंतप्रधान मोदींवरही टीका करायला, आंदोलन करायला हरकत नाही. पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टीका करतच आहेत. पण सत्यजित तांबे यांनी जरा तरी भान ठेवायला हवे. असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले तर, यानंतर कुणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोहत्या दिन’ साजरा करू शकतात. कारण, संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे रात्रंदिवस हजारो गायींची हत्या होत आहे. गोहत्येला कायद्याने बंदी असतांना कॅबिनेट मंत्र्यांच्या गावात सर्रासपणे गायींची कत्तल होत आहे. म्हणून तुमच्या नेत्यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. माझे म्हणणे चुकीचे आहे, असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तसे जाहीर करा, असेही वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.