महसूल अर्हता परीक्षेत काॅपी करणाऱ्यांवर दोन वर्षांसाठी बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:57+5:302021-09-17T04:26:57+5:30

नाशिक विभागातील लिपिक, टंकलेखक व तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांची महसूल अर्हता परीक्षा ३० ॲागस्ट ते २ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ...

Copies of Revenue Eligibility Tests are banned for two years | महसूल अर्हता परीक्षेत काॅपी करणाऱ्यांवर दोन वर्षांसाठी बंदी

महसूल अर्हता परीक्षेत काॅपी करणाऱ्यांवर दोन वर्षांसाठी बंदी

नाशिक विभागातील लिपिक, टंकलेखक व तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांची महसूल अर्हता परीक्षा ३० ॲागस्ट ते २ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली. दरम्यान यासाठी नेमलेल्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रावर दोन वेळा अचानक भेट दिल्यानंतर परीक्षा कक्षात एकूण ३३ परीक्षार्थी कर्मचारी काॅपी करताना आढळून आले. तसा अहवाल भरारी पथकाने विभागीय कार्यालयास सादर केला. त्यात ३० ॲागस्ट रोजी झालेल्या पेपर क्रमांक दोनमध्ये १० परीक्षार्थी, तर ३१ ऑगस्टच्या पेपर क्रमांक ३ दरम्यान एकूण २३ परीक्षार्थी यांनी काॅपी केली. त्यापैकी ६ परीक्षार्थींकडे परीक्षा कक्षात मोबाईल आढळले.

ही बाब शासकीय कर्मचाऱ्यांना अशोभनीय असून गंभीर स्वरूपाची आहे, असे ताशेरे ही विभागीय कार्यालयाने ओढले आहेत. या ३३ परीक्षार्थी कर्मचाऱ्यांचा सद्य परीक्षेचा निकाल कायमस्वरूपी राखीव ठेवून पुढील दोन वर्षे महसूल अर्हता परीक्षेस बसण्यास प्रतिरोध करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

-------------

काॅपी होत असताना केंद्रप्रमुख काय करत होते?

महसूल खात्यात प्रवेश केल्यानंतर महसूल अर्हता परीक्षा अनिवार्य असते. यामध्ये विविध महसुली कायदे, शासन कार्यपद्धती यावरील बाबींचा समावेश होतो. दरम्यान, परीक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर काॅपी होत असताना नेमलेले केंद्रप्रमुख व इतर अधिकारी नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

---------------

कठोर कारवाईची मागणी

राज्यातील महसूल अर्हता परीक्षेत कॉपी करणाऱ्या कॉपी बहाद्दर लिपिक आणि तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची राज्यातील अशी पहिलीच धडक कारवाई आहे. कॉपी करणारे हे महसूल विभागाचे लिपिक आणि तलाठी जनतेची कामे कशी करत असतील, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून त्यांच्यावर परीक्षा बंदीच्या कारवाई पेक्षा आणखी कठोर कारवाईची मागणी होत आहे.

------------

नगरचे सात कर्मचारी

परीक्षेत काॅपी करणाऱ्यांमध्ये नगर जिल्ह्यातील ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक १६ कर्मचारी जळगावचे आहेत. याशिवाय ६ नंदूरबारचे, ३ नाशिकचे, तर १ कर्मचारी धुळ्याचा आहे.

Web Title: Copies of Revenue Eligibility Tests are banned for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.