अकराशे जणांना जप्तीच्या नोटिसा
By Admin | Updated: February 24, 2016 23:42 IST2016-02-24T23:37:36+5:302016-02-24T23:42:09+5:30
अहमदनगर: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या अकराशे मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

अकराशे जणांना जप्तीच्या नोटिसा
अहमदनगर: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या अकराशे मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बुधवारी सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने वसुलीसाठी वाजंत्री वाजविली. अन्य प्रभाग समिती कार्यालयाची वाजंत्री बुधवारी बंद होती.
नगर शहरातील मालमत्ताधारकांकडे महापालिकेची १३६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. गत अकरा महिन्यात केवळ ३२ कोटी रुपयांची वसुली झाली. थकबाकी वसुलीसाठी शास्तीमाफीची सवलत तीन महिने देऊनही फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता जप्ती, नळजोड तोडणी मोहीम हाती घेण्याची सूचना आयुक्त विलास ढगे यांनी केली. त्यानुसार उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी प्रभाग समिती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या अकराशे मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची नावेही महापालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.
सावेडी प्रभाग समिती कार्यालयाचे अधिकारी एस.बी.तडवी यांनी वसुलीसाठी ढोल पथक ३१ मार्चपर्यंत बुक करून ठेवले आहे. या पथकाने बुधवारी मनमाड रस्त्यावरील व्यावसायिकांच्या दुकानासमोर ढोल वाजविले. पथक दुकानासमोर पोहचताच थकबाकी वसुलीचा धनादेश अधिकाऱ्यांना देण्यात आला. सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने दिवसभरात सहा लाख रुपयांची वसुली केली. बुरूडगाव प्रभाग समिती कार्यालयानेही पाच लाख रुपयांची वसुली केली. (प्रतिनिधी)