ठेकेदार, अधिकार्यांत समन्वयाचा अभाव
By Admin | Updated: July 10, 2023 12:07 IST2014-05-13T00:53:04+5:302023-07-10T12:07:23+5:30
अहमदनगर: महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने फेज टू पाणी योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

ठेकेदार, अधिकार्यांत समन्वयाचा अभाव
अहमदनगर: महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने फेज टू पाणी योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महापौर संग्राम जगताप यांनी नाराजी व्यक्त करून दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली. महापौर जगताप यांनी पाणी योजनेची आढावा बैठक सोमवारी घेतली. उपमहापौर सुवर्णा कोतकर, स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले, सभापती नसीम खान, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, कैलास गिरवले, माजी नगरसेवक निखील वारे, शरद ठाणगे, काका शेळके, ठेकेदार तापी प्रिस्टेटचे संचालक किशोर आग्रवाल, आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मुळा डॅम, विळद व वसंत टेकडी येथील पंपिंग मशिनरी बसविण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून निश्चितीनुसार काम होत नसल्याची बाब सल्लागार संस्थेच्या कार्यकारी अभियंत्या एस.बी.नरवाडे यांनी निदर्शनास आणून दिली. कामाचा वेग वाढवून काम संपवा अशी सूचना महापौर जगताप यांनी केली. नगरसेवक बोराटे, डागवाले, वारे यांनी शहरात सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी) आता दर सोमवारी आढावा महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग, ठेकेदार संस्था व सल्लागार संस्थेची आढावा बैठक दर सोमवारी महापालिकेत होणार आहे. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कामाचा वेग वाढविण्याचा उद्देश त्यामागे आहे. दंडात्मक कारवाईचा विसर गत पंधरवाड्यात महापौर जगताप यांनी अशीच आढावा बैठक घेतली होती. त्याला ठेकेदार संस्थेचे संचालक गैरहजर होते. ठेकेदार संस्थेकडून बारचार्ट घ्यावा, त्यानुसार काम झाले नाही तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अशी सूचना महापौर जगताप यांनी आयुक्त कुलकर्णी यांना केली होती. पण त्या कारवाईचा सोमवारच्या बैठकीत सगळ्यांनाच विसर पडला. बारचार्टनुसार काम होत नाही हे समोर येऊनही दंडात्मक कारवाईवर सगळेच मौनीबाबा झाले.