लोककलावंतांनी आयुष्यात यशाचे सातत्य जपावे
By Admin | Updated: February 21, 2016 23:45 IST2016-02-21T23:39:18+5:302016-02-21T23:45:24+5:30
योगेश गुंड, अहमदनगर लोककलावंत मोठ्या संघषार्तून नाव कमावतो, प्रसिध्दी, पैसा, मानसन्मान सर्व काही मिळवतो. यशाचे शिखर गाठत असताना मात्र त्याचे पाय चुकीच्या दिशेने वळतात.

लोककलावंतांनी आयुष्यात यशाचे सातत्य जपावे
योगेश गुंड, अहमदनगर
लोककलावंत मोठ्या संघषार्तून नाव कमावतो, प्रसिध्दी, पैसा, मानसन्मान सर्व काही मिळवतो. यशाचे शिखर गाठत असताना मात्र त्याचे पाय चुकीच्या दिशेने वळतात. तो सर्व काही मिळवूनही काळाच्या ओघात सारे गमावून बसतो. नंतर त्याच्या मयतीला लोकवर्गणी गोळा करावी लागते, असे अनेक जुन्या व मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात घडले. आपल्या आयुष्यात ते जपा, असा वडिलकीचा सल्ला जेष्ठ लोकगायक आनंद शिंदे यांनी नव्या कलाकारांना दिला आहे.
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे नगर तालुक्यातील दरेवाडी येथे आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ शी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.
गायनाचे क्षेत्र कसे निवडले?
घरात गायनाचे वातावरण होते. वडील प्रल्हाद शिंदे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकगायक त्यांच्या कडूनच गायनाचे धडे शिकलो .
वडील तर भावगीते गायचे ?
हो ते भावगीतांमधून जास्त प्रसिद्ध झाले. पण त्यांनी अनेक लोकगीते सुध्दा गायली आहेत . कुठं जातील काळ्या पोरी यासारख्या लोकगीतांनी त्यांना खूप मोठे केले. हाच वारसा माझा भाऊ मिलिंद व मी पुढे चालवला .
कोणत्या गीताने तुमचे आयुष्य बदलले ?
जवा नवीन पोपट हा.. लागला मिठू मिठू बोलायला.. या गीतामुळे मी राज्यभर प्रसिद्ध झालो. हे गाणे मिलिंदणे एका मुकाबल्यासाठी तयार केले होते. त्या गाण्याचे रेकोर्डिंग मात्र माझ्या आवाजात झाले.
अनेक रियालिटी शो किंवा इतर कार्यक्रमांचे परीक्षक तुम्ही असता, काय वाटते नवे कलाकार पाहून?
त्यांना आता सहज स्टेज व संधी मिळते. आमच्यावेळी हे सारे काही नव्हते. मात्र थोडीशी प्रसिद्धीची हवा डोक्यात घुसली की ते वाहवत जातात. जास्त कष्ट न करता त्यांना प्रसिद्धी व पैसा हवा असतो. मात्र, यश टिकवून ठेवण्यात ते कुठेतरी कमी पडतात.
नव्या कलावंतांना काय संदेश द्याल?
कलावंतांनो, तुम्ही जेव्हा यशाचे शिखर गाठता, तेव्हा ते यश टिकवून धरा. चुकीच्या नादाला लागू नका. व्यसनांपासून दूर रहा. कमावलेला पैसा व मानसन्मान सांभाळा. नाहीतर तुमच्या मयतीला लोकवर्गणी जमा करावी लागेल, असे अनेक जुन्या प्रसिद्ध कलाकारांसोबत घडले आहे. तुम्ही तसे घडू देऊ नका. मी व मिलिंद दोघांनी ते आजपर्यंत जपले, नाहीतर अशी वेळ आमच्यावरही आली असती.
तुमच्या नव्या पिढीबाबत काय?
माझा मुलगा आदर्श हा त्याचे आजोबा प्रल्हाद व वडील, चुलते यांच्यापेक्षा सरस निघाला. जे आम्ही मिळवू शकलो नाही, ते त्याने मिळवले. त्याचा वडील म्हणून अभिमान वाटतो. दलित समाजातील पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवून त्याने आम्हाला धन्य केले.