जिल्ह्यातील ३६ गावांमध्ये दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:22+5:302021-07-15T04:16:22+5:30
अहमदनगर : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो. नगर जिल्ह्यात मागील महिन्यात ...

जिल्ह्यातील ३६ गावांमध्ये दूषित पाणी
अहमदनगर : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो. नगर जिल्ह्यात मागील महिन्यात १७३१ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात ३६ गावांतील ४५ (२.६० टक्के) नमुने दूषित आढळले असून तेथे आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर नियमितपणे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून महिन्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांतील १७३१ पाणी नमुने तपासण्यात आले. यातील ४५ नमुने दूषित आढळले आहेत. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रशासनाकडून दरवर्षी उपाययोजना केल्या जातात; परंतु ग्रामस्थ खबरदारी घेत नसल्याने दरवर्षी पाणी नमुने दूषित आढळतात.
जलस्त्रोताजवळ उकिरडे, सांडपाणी, शौचालयाचा खड्डा असल्याने स्रोत दूषित झाले आहेत. अशा ठिकाणी ब्लिचिंग पावडरसारखे जलशुद्धीकरण करणाऱ्या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत.
------------------
तपासणी केलेले नमुने - १७३१
किती नमुने दूषित - ४५
-----------------
तालुकानिहाय आढावा
तालुका नमुने घेतले दूषित नमुने
नगर १३३ ६
अकोले १७५ ५
जामखेड ११९ ०
कर्जत ७६ ०
कोपरगाव १३५ ३
नेवासा १३८ ०
पारनेर १५१ ०
पाथर्डी १५२ ७
शेवगाव ९३ ५
राहाता ५० १
राहुरी १३० ७
संगमनेर १७० ३
श्रीगोंदा १५४ ०
श्रीरामपूर ५५ ०
--------------------
एकूण १७३१ ४५
---------------------
पारनेर, राहुरी, पाथर्डीत सर्वाधिक दूषित पाणी
जिल्ह्यात आढळलेल्या ४५ दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वाधिक ८ नमुने पारनेर, तर प्रत्येकी ७ दूषित नमुने पाथर्डी, राहुरी तालुक्यात आढळलेले आहेत. त्यानंतर नगर तालुक्यात ६ दूषित नमुने आढळले आहेत.
----------
या गावांत दूषित पाणी
नारायणडोहो, कामरगाव, नागरदेवळे, देहरे, नांदगाव, सजलपूर, खिरविरे, देवठाण, संवत्सर, कोळपेवाडी, हतालखिंडी, वडुले, रायतळे, अस्तगाव, जवळा, सांगवीसूर्या, खांडगाव, खिरडे, आल्हनवाडी, पाडळी, चितळी, जवळे, जिरेवाडी, सुलतानपूर खु., आव्हाने बु., आखेगाव, शेकटे खु., विजापूर,अस्तगाव, शिलेगाव, तांदूळवाडी, अंमळनेर, चांदेगाव, जातक, राजापूर, वडगाव पान अशा ३६ गावांत ४५ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
---------
दूषित पाणी नमुने असलेल्या गावांना उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याप्रमाणे गावांनी खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात. पाणी स्त्रोत असलेल्या परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
--------------