ग्राहकांनी वाढत्या वीज वापरावर लक्ष ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:38+5:302021-04-29T04:16:38+5:30
अहमदनगर : संचारबंदी काळात ग्राहकांनी वाढत्या वीज बिलावर लक्ष ठेवावे. शासकीय कर्मचारी घरून करीत असलेले काम (वर्क फ्रॉम ...

ग्राहकांनी वाढत्या वीज वापरावर लक्ष ठेवावे
अहमदनगर : संचारबंदी काळात ग्राहकांनी वाढत्या वीज बिलावर लक्ष ठेवावे. शासकीय कर्मचारी घरून करीत असलेले काम (वर्क फ्रॉम होम) आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज वापरावर लक्ष ठेवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीज वापरानुसार संभाव्य वीजबिलाचा अंदाज पाहण्यासाठी बिल कॅल्क्युलेटर (गणक) उपलब्ध असून घरातील वीज वापरावर लक्ष ठेवून अनावश्यक वीज वापर टाळता येऊ शकतो. वीज ग्राहकांनी आपल्या वीज वापरावर लक्ष व नियंत्रण ठेवावे आणि मीटर रीडिंग शक्य नसलेल्या ठिकाणी मोबाईल रीडिंगचा फोटो पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच उन्हाच्या तीव्रतेसोबत तापमानाचा पाराही वाढत असल्याने गारवा निर्माण करण्यासाठी पंखे, वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही, संगणक वा लॅपटॉप आदींचा वापर सुद्धा वाढत आहे. घरीच राहणारे नागरिक, घरातून काम करणारे कर्मचारी व वाढते तापमान यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीज वापरातील वाढ अनिवार्य ठरणार आहे. यामध्ये पंखे व कुलरचा वापर १८ ते २४ तास होण्याची शक्यता आहे. वीज बिलाच्यामागे वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३००, ३०१ ते ५०० व ५०१ ते १००० युनिट संदर्भातील दर छापलेले असतात. त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा. उपकरणांचे वॅट, त्याचा दैनंदिन वापर याची माहिती घेतल्यास विजेच्या वापरावर लक्ष ठेवून नियोजन केल्यास वीज बिल कमी करता येईल व आलेले वीज बिल एवढे का? याचा उलगडा नक्की होईल.
----------
ग्राहकही पाठवू शकतात रीडिंग
महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास मोबाईल अॅपच्याद्वारे मीटर रीडिंग पाठविता येईल तसेच प्राप्त वीज देयक घरबसल्या महावितरणचे संकेतस्थळ वा मोबाईल अॅपच्या द्वारे ऑनलाईन भरून ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.