विखे-थोरात वादात कॉँग्रेसची फरपट

By Admin | Updated: June 7, 2016 23:33 IST2016-06-07T23:28:22+5:302016-06-07T23:33:50+5:30

अहमदनगर: आघाडीत झालेल्या वाटाघाटीनुसार अडीच वर्षानंतर कॉँग्रेसला महापौर पद मिळणार असा दावा करणाऱ्या कॉँग्रेस पक्षाची नगर शहरात पुरती वाताहत झाली आहे.

Congress's flutter in the debate | विखे-थोरात वादात कॉँग्रेसची फरपट

विखे-थोरात वादात कॉँग्रेसची फरपट

अहमदनगर: आघाडीत झालेल्या वाटाघाटीनुसार अडीच वर्षानंतर कॉँग्रेसला महापौर पद मिळणार असा दावा करणाऱ्या कॉँग्रेस पक्षाची नगर शहरात पुरती वाताहत झाली आहे. थोरात-विखे गटातील वादात नगर शहरात कॉँग्रेसला महापालिकेतील सत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कॉँग्रेस नगरसेवकांत याची कुजबुज सुरू असून उघडपणे बोलण्यास मात्र कोणी तयार नाही.
नगर शहर कॉँग्रेस माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात विभागल्याचे सर्वश्रुत आहे. कधी विखे गट तर कधी थोरात गट बाजी मारत असतो. प्रदेश कॉँग्रेसच्या नेत्यांचा शहर जिल्हा दौरा आला की त्यांचीही या गटातटात ओढाताण झाल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. ६८ नगरसेवक असलेल्या अहमदनगर महापालिकेत कॉँग्रेसचे ११ नगरसेवक आहेत. त्यातील किमान दहा नगरसेवक हे विखे यांचे नेतृत्व मानणारे आहेत. प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण हे एकटेच नगरसेवक थोरात गटाचे म्हणून गणले जातात. युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महिनाभरापूर्वीच कॉँग्रेसला गृहीत धरू नका असे पत्र प्रसिध्द केले होते. त्या पत्राला विखे गटाच्या नगरसेवकांनी तसेच प्रत्युत्तर दिले. विखे-थोरात गटात कॉँग्रेसमधील वाद असल्याचा हा पुरावाच पुरेसा ठरावा.
२०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना अडीच वर्षानंतर महापौर पद कॉँग्रेसला असा समझोता झाल्याचे नंतर कॉँग्रेसचे नेते सांगत होते. राष्ट्रवादी मात्र ज्याचे संख्याबळ जास्त त्याचा महापौर असा फॉर्म्युला सांगत होती. या वादात सेनेने युतीचे तसेच आघाडीतील नगरसेवक गळाला लावत त्यांना सुरक्षित स्थळी रवाना केले. संख्याबळाची बेरीज जुळत नसल्याने आघाडीत आजमितीला महापौर पदासंदर्भात शांतता आहे. विखे-थोरात यांना महापौर पद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे ज्ञात झाल्यानंतरही त्यांनी कॉँग्रेस नगरसेवकांकडे साधी विचारणाही केली नसल्याचे नगरसेवक खासगीत सांगतात. नेते लक्ष देत नाही असे निदर्शनास येताच कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही ‘माकड उड्या’ हाणल्या. ११ नगरसेवकांपैकी कॉँग्रेसचे तीन नगरसेवक युतीच्या कळपात दाखल झाल्याचा दावा सेनेकडून केला जात आहे. विखे-थोरात यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत शहर कॉँग्रेसची विचारपूस न केल्याने पक्षाची वाताहत झाल्याची चर्चा पक्षीय वर्तुळात सुरू आहे. उघडपणे मात्र कोणी बोलत नाही. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस पक्ष निरीक्षक नियुक्त करेल. तो नगरसेवकांची मते अजमावील. नंतर प्रदेश देईल त्या आदेशनुसार नगरसेवक भूमिका घेतील अशी सारवासारव आता दीप चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: Congress's flutter in the debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.