Ahilyanagar Congress : आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांनी काँग्रेसच्याअहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाही त्यांनी राजीनामा पाठवला आहे.
काळे यांनी राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही. बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला शहरात धक्का बसला आहे. साडेचार वर्षापूर्वी थोरातांनी काळे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी आलेल्या पटोले यांनी काळे यांची फेरनिवड करत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाचीदेखील जबाबदारी काही काळ काळे यांच्यावर सोपवण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीत नगरची जागा काँग्रेसकडे घेत काळेंना उमेदवारी देण्याचे सूतोवाच स्वतः थोरातांनी अनेक वेळा केले होते. परंतु वाटाघाटीत काँग्रेसला ही जागा सुटली नव्हती. तेव्हापासून काळे नाराज असल्याचे बोलले जात होते. राजीनामा देताना काळे यांनी मात्र, थोरातांवर नाराजी व्यक्त केलेली नाही. दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काळे हे 'शिवबंधन' बांधणार अशी, चर्चा आहे.