श्रीगोंद्यात काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:05+5:302021-07-15T04:16:05+5:30
श्रीगोंदा : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस अशा इंधनांची दरवाढ झाल्याने केंद्र सरकारचा निषेध करत श्रीगोंदा येथे काँग्रेसने बुधवारी सकाळी ...

श्रीगोंद्यात काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात धरणे आंदोलन
श्रीगोंदा : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस अशा इंधनांची दरवाढ झाल्याने केंद्र सरकारचा निषेध करत श्रीगोंदा येथे काँग्रेसने बुधवारी सकाळी पायी रॅली काढली. यावेळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनाही सहभागी झाली होती.
जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. सुरवातीला शहरातील जोधपूर मारूती चौकातून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पायी रॅली काढली. नंतर इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी याबाबत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात सह्यांची मोहीम यावेळी सुरू केली.
अनुराधा नागवडे म्हणाल्या, महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅसचे भाव डोईजड झाल्याने महिलांना चुलीवर स्वयंपाक सुरू करण्याची वेळ आली आहे. सुशिक्षित तरुणाईच्या हाताचे काम काढून घेण्यात आले आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले, भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेला लुटण्याचे काम सुरू केले आहे. डिझेल-पेट्रोल दरवाढीने तर कहरच केला आहे.
अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, नगरसेविका सीमा गोरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, अरुणराव पाचपुते, मनोहर पोटे, राजेंद्र लोखंडे, गणेश भोस, सुनील भोस, सतीश मखरे, बाळाप्पा पाचपुते, चांगदेव पाचपुते आदी उपस्थित होते.
-----
१४श्रीगोंदा काँग्रेस
श्रीगोंदा येथे काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांनी निवेदन दिले.