काँग्रेस तटस्थ की नव्या आघाडीसोबत?
By Admin | Updated: June 19, 2016 23:13 IST2016-06-19T23:10:15+5:302016-06-19T23:13:01+5:30
अहमदनगर : काँग्रेस पक्ष जातीयवादी पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने रविवारी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला

काँग्रेस तटस्थ की नव्या आघाडीसोबत?
अहमदनगर : काँग्रेस पक्ष जातीयवादी पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने रविवारी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नव्या आघाडीसोबत जाणार की तटस्थ राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे मनसेच्या चारही नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यामार्फत दिले आहेत. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक रविवारी पुन्हा एकदा वेगळ््याच वळणावर येऊन ठेपली आहे.
महापौरपदासाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता मतदान होणार आहे. शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी आघाडी करून हिरावून घेतल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगलाच दाहरा बसला आहे. भाजपाचा एक गट शिवसेनेसोबत तर, दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत आहे. त्यामुळे महापौर शिवसेनेचा होणार की भाजपाचा याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. भाजपाचा नवा गटनेता म्हणून सुवेंद्र गांधी यांची निवड करण्यात आली. तसा प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केला. मात्र महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आतच गट नोंदणी करता येत असल्याने गांधी गटनेते होऊ शकत नाहीत, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे भाजपाचे गटनेते दत्ता कावरे यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या सुरेखा कदम आणि दत्ता कावरे यांना मतदान करावे, असे आदेशात म्हटले आहे. हा व्हीप कावरे यांनी रविवारी बजावला आहे.
विखे पाटील यांचा दे धक्का
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसशी घरोबा करून शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे महापौरपदाच्या उमेदवार नंदा मनेष साठे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र रविवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी जातीयवादी पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीबाबत नगरसेवकांनी काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय प्रदेश कमिटी घेणार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे विखे पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. विखे पाटील आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याचेही समजते. त्यामुळे महापौर निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहणार की नव्या आघाडीसोबत जाणार हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.
मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करावे, असा आदेश मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळ नांदगावकर यांच्यामार्फत दिला आहे. शिवसेनेत गेलेले मात्र तांत्रिकदृष्ट्या मनसेत असलेल्या किशोर डागवाले यांच्यासह चारही नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम आणि भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार दत्ता कावरे यांना मतदान करावे, असे आदेश नांदगावकर यांनी दिले आहेत. तसे अधिकृत पत्र सोमवारी प्राप्त होईल.
-सचिन डफळ, जिल्हा संघटक, मनसे
कावरे यांनी बजावला व्हीप
भाजपाच्या सर्व नऊ उमेदवारांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम आणि उपमहापौरपदाचे उमेदवार दत्ता कावरे यांना मतदान करावे, असा पक्षादेश भाजपाचे गटनेते दत्ता कावरे यांनी बजावला आहे. याबाबतचे कावरे यांचे पत्र प्रसिद्धीमाध्यमांना पाठविले आहे. दरम्यान शनिवारी सुवेंद्र गांधी यांनी आपणच गटनेते झाल्याचे सांगून तसा व्हीप प्रसिद्ध केला होता.
राष्ट्रवादीने नगरसेवकांच्या घरावर डकविला व्हीप
महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेस-अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीने आपल्या नगरसेवकांना पक्षादेश दिला आहे. आदेशाच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांच्या घरावर डकविल्या आहेत. महापौरपदासाठी नंदा मनेष साठे व उपमहापौरपदासाठी श्रीपाद छिंदम हेच महानगर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनाच मतदान करावे, असे पक्षादेशात म्हटले आहे. आघाडीचे गटनेते समद खान यांच्या नावाने पक्षादेश बजावण्यात आला आहे. या पक्षादेशानुसार आघाडीतील सर्वांनी भाजपाला मतदान करणे बंधन कारक करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीत २१ नगरसेवक आहेत. मात्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे, कलावती शेळके, सुनीता भिंगारदिवे हे तिघे बाहेर पडून शिवसेनेच्या तंबुत गेले आहेत. ते तिघेही नगरसेवक सहलीवर असल्याने त्यांच्या घरावर व्हीप डकविण्यात आला आहे.