काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?
By Admin | Updated: January 12, 2015 13:44 IST2015-01-12T13:40:07+5:302015-01-12T13:44:30+5:30
जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. विशेष करून यात राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादीने बैठक बोलवली आहे.
जिल्हा परिषदेचे तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यात मिरी (पाथर्डी) राजूर (अकोले) तर कोळगाव (श्रीगोंदा) या जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आहेत. अध्यक्षपदासह दोन विषय समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात तर उपाध्यक्षपदासह दोन विषय समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे.
तीन गटाच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. यात स्थानिक आमदार आणि इच्छुकांना बोलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली. काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर एकत्रित निवडणूक लढविण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मिरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार मोहन पालवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केले. पालवे चारवेळा या गटातून विजयी झालेले आहेत. मात्र, अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवार मोनिका राजळे यांनी पालवे यांच्या पत्नीचा पराभव केला होता. आता राजळे भाजपाच्या तिकिटावर आमदार झाल्याने पुन्हा पालवे यांना संधी मिळालेली आहे.
या तीन जागांवर भाजपा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश त्या त्या तालुकाध्यक्षांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी उमेदवारीचा अंतिम निर्णय गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदेच घेणार असल्याची माहिती सरचिटणीस भानुदास बेरड यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकीत सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर होणार आहेत.